जळगाव मिरर | ११ जुलै २०२४
चोपडा तालुक्यातील चहार्डी येथील खंडू बाबा नगरमधील रहिवासी व बारावीतील विद्यार्थ्याने नैराश्यातून झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, चहार्डी येथील लोकेश प्रवीण पाटील (वय १७) असे मृत तरुणाचे नाव आहे. लोकशने नैराश्यातून गावाबाहेरील चोपडी वाट शिवारातील अनुप उदय पाटील यांचा शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना १० रोजी उघडकीस आली. मयत लोकेश हा इयत्ता बारावीत शिक्षण घेत होता. ९ रोजी जात प्रमाणपत्र काढण्यासाठी जातो, असे सांगून तो घरातून बाहेर निघाला होता. मात्र, १० रोजी सकाळी शेतात जाणाऱ्या व्यक्तीने झाडास कुणीतरी गळफास घेतल्याचे पाहिले. ही माहिती गावात समजल्यानंतर लोकेशनेच गळफास घेतल्याचे स्पष्ट झाले. मयत लोकेश हा कै. भाऊसाहेब शामराव शिवराम पाटील उच्च माध्यमिक विद्यालयात किमान कौशल्य विभागात बारावीचे शिक्षण घेत होता. तो मनमिळावू व सर्वांचा आवडता विद्यार्थी होता. लोकेश याच्या पश्चात आई, वडील, भाऊ, बहीण, आजी असा परिवार आहे. या प्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.