जळगाव मिरर | २३ जुलै २०२४
मित्रांसोबत धबधब्यात अंघोळ करतांना त्याठिकाणी दगडावर साचलेल्या शेवाळावर पाय घसरुन कुंडात बुडून गौरव किशोर नेरकर (वय २१, रा. खंडेराव नगर) या तरुणाचा दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना सोयगाव तालुक्यातील पळाशी येथील धारकुंड येथे रविवारी सायंकाळच्या सुमारास घडली. आज सकाळच्या सुमारास त्या तरुणाचा मृतदेह मिळून आला, त्यानंतर मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन केल्यानंतर सायंकाळी त्याच्यावर अंत्यस्कार करण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील खंडेराव नगरात गौरव नेरकर हा तरुण आपल्या मित्रांसह सोयगाव तालुक्यातील पळाशी येथील धारकुंड येथे धबधब्यावर फिरण्यासाठी गेले होते. धबधब्याखाली अंघोळ करत असतांना दगडावर साचलेल्या शेवाळावरुन गौरवचा पाय घसरला, आणि तो तेथे असलेल्या कुंडात बुडाला. गौरवला पोहता येत नसल्याने तो इतरांना काळी कळण्याच्या आत कुंडातील पाण्यात बुडाला. ही घटना त्याच्यासोबत असलेल्या मित्रांना समजताच त्यांनी आरडाओरड केली. यावेळी त्याठिकाणावरील काही तरुणांनी पाण्यात उडया घेतल्या, मात्र गौरव हा मिळून आला नाही. घटनेची माहिती मिळताच सोयगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकट बारवाल, पोलीस उपनिरीक्षक शेख यांच्यासह कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. मात्र सायंकाळी अंधार पडल्यामुळे शोध कार्यात अडचणी येत असल्याने त्यांना शोधकार्य थांबविण्यात आले. त्यानंतर सोमवारी सकाळच्या सुमारास पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने शोध कार्य सुरु केले.
सोमवारी सकाळच्या सुमारास धारकुंड येथील कुंडात शोध मोहीम राबविल्यानंतर काही वेळानंतर गौरवचा मृतदेह मिळून आला. त्यानंतर त्याला तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केला. याठिकाणी त्याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. यावेळी गौरवचा मृतदेह बघताच त्याच्या कुटुंबियांसह मित्रांनी एकच आक्रोश केला.