जळगाव मिरर | १५ जुलै २०२४
रस्त्याने जात असतांना दुचाकी दुभाजकावर आदळून मयूर नरेंद्र पाटील वय २४, रा. विठ्ठलवाडी या तरुण जागीच ठार झाला. ही घटना शनिवारी रात्री बारा वाजेच्या सुमारास न्यू. बी. जे. मार्केट समोर घडली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील विठ्ठल वाडी परिसरात मयुर पाटील हा तरुण वास्तव्यास आहे. त्यांचे खोटेनगर स्टॉजवळ दुचाकी दुरुस्तीचे गॅरेज असून तो वडीलांना गॅरेजवर मदत करीत होता. शनिवार दि. १३ जुलै रोजी रात्री बारा वाजेच्या सुमारास मयूर हा त्याच्या दुचाकीने बेंडाळे चौकातून पांडे चौकाकडे जात होता. यावेळी त्याची दुचाकी न्यू. बी. जे. मार्केट समोरील दुभाजकावर आदळली. यामध्ये मयूर हा गंभीर जखमी झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तात्काळ मयूरला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करीत मयत घोषीत केले.