जळगाव मिरर | ११ ऑक्टोबर २०२४
कंपनीच्या पीएफ योजनेत थकबाकी असल्याने सेटलमेंट करण्याच्या मोबदल्यात व्यावसायिकाकडून २५ हजारांची लाच मागितली होती. सीबीआय पथकाने मंगळवारी एमआयडीसीतील पीएफ कार्यालयावरछापा टाकला. या प्रकरणी भविष्य निर्वाह निधी कार्यालयाचे मुख्य वित्त व लेखाधिकारी रमन वामन पवार (वय ५८, रा. जळगाव) यांना अटक केली. या कारवाईमुळे जिल्ह्यात खळबळ माजून गेली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्या वडिलांच्या नावाने कंपनी (फर्म) असून त्या माध्यमातून कामगारांचा पुरवठा केला जातो. या कंपनीचे लेखा परीक्षण संदर्भात त्रुटी असल्याची पीएफ कार्यालयाकडून तक्रारदार यांना नोटीस बजावली होती. मार्च २०२३ च्या पीएफच्या पेमेंटमध्ये चूक आहेत. तसेच उणिवा आहेत, असे सांगण्यात आले होते. कंपनीचा रिपोर्ट योग्यतेच्या मोबदल्यात मुख्य लेखाधिकारी रमन पवार यांनी ५० हजारांची लाचेची मागणी केली. तडजोडअंती २५ हजार रुपये देण्याचे ठरले. तक्रारदार यांनी या प्रकरणी पुणे सीबीआय कार्यालयाकडे तक्रार दिली. त्यानुसार सीबीआयच्या पथकाने छापा टाकून वित्त अधिकाऱ्याला ताब्यात घेतले आहे.