जळगाव मिरर | १९ सप्टेंबर २०२४
राज्यातील अनेक महामार्गावर अपघाताच्या मालिका सुरु असतांना अमरावती जिल्ह्यातील नेर आगाराची यवतमाळ-चिखलदरा बस मेळघाटात मोथा गावाजवळ जळून खाक झाली. बसमध्ये २५ प्रवासी होते. ही घटना बुधवारी दि. १८ रात्री साडेआठ वाजताच्या दरम्यान घडली. चालकाने प्रसंगावधान राखल्यामुळे सर्व प्रवासी सुखरूप असून कुठलीही जीवितहानी झालेली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, नेर आगाराची बस क्रमांक एमएच ४० ए क्यू ६१६९ ही यवतमाळ वरून चिखलदरा येथे जात होती. मोथा गावाजवळ घाट वळणावर बसच्या इंजिनने अचानक पेट घेतला. ही बाब चालकाच्या लक्षात येताच त्याने वाहकाला सुचित करत सर्व प्रवाशांना तत्काळ बस मधून खाली उतरवले. या घटनेनंतर संपूर्ण बस जळून खाक झाली. बसमधील २५ प्रवाशांपैकी काहीजण स्थानिक मोथा गावातील रहिवासी होते. त्यामुळे त्यांनी या घटनेची माहिती ग्रामस्थांना दिली. ग्रामस्थांनी चिखलदरा अग्निशमन दलाला या संदर्भात कळविले. अग्निशमन दलाचे वाहन घटनास्थळी पोहोचले, मात्र त्यामध्ये पाणीच नसल्याचे लक्षात येताच एकच खळबळ उडाली. त्यामुळे चिखलदरा येथून पाण्याचा खासगी टँकर मागविण्यात आला. तसेच मोथा गावातूनही नागरिकांनी टँकरमधून पाणी आणून बसला लागलेली आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र तरी देखील बस संपूर्णतः जळून खाक झाली. चिखलदरा मुख्याधिकारी यांनी यासंदर्भात चौकशीचे आदेश दिल्याची माहिती प्राप्त झाली आहे.