जळगाव मिरर | १७ जुलै २०२४
एसटी बसने दुचाकीला मागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक महिला जागीच ठार झाल्याची घटना रावेरात घडली. याबाबत रावेर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करुन बस चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, यावल तालुक्यातील अमोदा येथील संदिप पाटील व त्यांच्या पत्नी दोघेही बंभाडा (मध्य प्रदेश) येथून दुचाकी (एमएच १४, एक्यू – ११९६) ने विवाह सोहळा आटोपून सायंकाळी परत आमोदे येथे येत होते. येथील बालाजी टोल काट्याजवळ अहिरवाडी कडून रावेरकडे येणारी बस (एम.एच.१४ बीटी ३९१६) ने त्यांच्या दुचाकीला मागून जबर धडक दिली. या अपघातात दुचाकीच्या मागे बसलेल्या आरती संदिप पाटील (वय ३५) या खाली पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर त्यांना येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शवविच्छेदन केले. याबाबत संदिप पाटील यांनी रावेर पोलीस ठाण्यात दिलेल्या माहितीवरून बस चालक शेख तौफिक शेख रफिक (रा. फैजपूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी बस चालकास ताब्यात घेतले आहे.