जळगाव मिरर | २५ ऑक्टोबर २०२३
देशभरातील अनेक राज्यात गुन्हेगारी घटना घडत असतांना यात जमिनीवरून देखील वाद होत असतात, असाच एक वाद राजस्थानमध्ये घडला आहे. ज्याची हळहळ देशभर होत आहे. राजस्थानातील भारतपूर जिल्ह्यातील बयाना भागात बुधवारी ही अमानुष घटना घडली आहे. याचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.
राजस्थान पोलिसांच्या माहितीनुसार, बयाना इथल्या सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अड्डा गावात गुर्जर कुटुंबात बऱ्याच काळापासून जमिनीचा वाद सुरु होता. बुधवारी हा वाद टोकाला पोहोचला. यावेळी नरपत सिंह या तरुणाची हत्या करण्यात आली. त्याला ट्रॅक्टरखाली चिरडून ठार मारण्यात आलं. ठार झालेला आणि ठार मारणारा हे दोघे भाऊ आहेत.
या घटनेमध्ये आरोपीनं नरपत गुर्जरच्या अंगावर ट्रॅक्टर घातला. मागच्या चाकाखाली आल्यानंतर त्याच्या अंगावरुन आठ वेळा ट्रॅक्टर चालवण्यात आला. यावेळी कुटुंबातील इतर लोकांनी आरोपीला थांबवण्याचा प्रयत्न केला. पण तरीही त्यानं हा विरोध जुमानला नाही आणि ट्रॅक्टर चालवण सुरुच ठेवलं. पोलिसांना या घटनेची माहिती कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छदनासाठी पाठवण्यात आला आहे. त्यानंतर आरोपी आणि त्याच्या कुटुंबियांनी गावातून पळ काढला. त्यांना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी पथक पाठवलं आहे.