अमळनेर : विक्की उत्तम जाधव
राज्याचे कृषी मंत्री अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळाने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी बुधवारी धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्हा दौऱ्यावर आले होते. ते अमळनेर शहरातून जाणार असल्याची माहिती ठाकरे गटाच्या सेना कार्यकर्त्याना मिळाली आणि त्यांनी काळे झेंडे दाखवण्याचा निर्णय घेतला होता. म्हणून सेना कार्यकर्त्यांनी बोरी नदीच्या मुख्य पुलावर गर्दी केली होती. तिकडे गुप्त वार्ता विभागाला याची माहिती मिळाल्याने त्यांनी मंत्री अब्दुल सत्तार शहरात आल्यानंतर पोलिसांच्या पायलट वाहनाने त्यांना छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहापासून नगरपालिका, सुभाष चौक मार्गे वळवले.
तिकडून वाहने सरळ बंद असलेला गांधलीपुरा पुलावरून पैलाड भागाकडे वळवली पोलिसांच्या एका पथकाने बोरी नदीच्या पुलावर उभ्या उद्धव सेनेच्या कार्यकर्त्यांना बोलण्यात गुंतवून ठेवले. आणि पोलिस हे मंत्री सत्तार यांना गांधलीपुरा पुलावरून पैलाड भागाकडे नेण्यास यशस्वी झाले. यामुळे पोलिसांचा बी प्लॅन पाहून ठाकरे गटाचे शिवसैनिक गोंधळले. त्यांनी मुख्य पुलावरून मंत्र्यांना काळे झेंडे, खोके, दाखवण्यासाठी धाव घेतली. मात्र वाहतूक पोलिसांनी गाड्या आडव्या करून त्यांना रोखण्यात यश मिळवले. शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहर प्रमुख सुरज परदेशी, उपशहर प्रमुख प्रमोद शिंपी, नाना ठाकूर, उमेश अंधारे, मोहन भोई, राकेश परदेशी, नितीन चौधरी, मनोज ठाकरे, मंगल भावसार, व शेकडो शिवसैनिक यांनी तकऱ्यांच्या मालाला भाव का मिळत नाही तसेच वादळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पंचनामे अजूनही होत नाही, असे काही प्रश्न मंत्री सत्तार यांना विचारायला उपस्थित होते.
