जळगाव मिरर | २ सप्टेबर २०२३
देशात गेल्या अनेक वर्षापासून महागाई वाढत आहे तर सिलिंडरचे दर देखील मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती पण नुकतेच या दर कमी झाल्याने जनतेला मोठा दिलासा भेटला असून आता ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी एक किस्सा सांगितला आहे.
सध्याच्या सरकारने गॅस सिलिंडरची किंमत २०० रुपयांनी कमी केली आहे. मात्र त्या गॅसवर तुम्ही शिजवणार काय? कारण भाजीपाला महाग झालाय, डाळी महाग झाल्या आहेत. या सरकारने महागाई प्रचंड वाढवली आहे. हेच भाजपाचे लोक २०१२ मध्येही सिलिंडरच्या दरांविरोधात आंदोलन करत होते. त्यावेळी मला बाळासाहेब ठाकरेंनी झापलं होतं असं म्हणत उद्धव ठाकरेंनी २०१२ चा तो किस्सा सांगितला आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या होऊ द्या चर्चा या कार्यक्रमात उद्धव ठाकरेंनी जे भाषण केलं त्या भाषणात त्यांनी हा किस्सा सांगितला.
मला आजही आठवतं आहे २०१२ हे वर्ष होतं. तेव्हा सुषमा स्वराज यांनी मला फोन केला भारत बंद करायचा आहे. मी बाळासाहेबांना विचारलं, मला म्हणाले गणपतीच्या दिवशी? छट् त्यांना सांगून टाक आम्ही गणपतीचा सण असताना भारत बंद वगैरे काही आंदोलन करत नाही. मला चांगलं आठवतं आहे कारण त्यावेळी माझी अँजिओप्लास्टी झाली होती. त्याही वेळा गणपतीच्या दिवसात यांनी भारत बंद केला होता. मी त्या आंदोलनाला गेलो आणि दुसऱ्या दिवशी माझा फोटो आला गॅस सिलिंडर हातात घेतलेला दिसत होता. त्यानंतर मला बाळासाहेबांनी मला झापलं अरे तुझी अँजिओप्लास्टी झाली आणि तू सिलिंडर कसा काय घेतलास हातात. बाळासाहेब माझ्यावर चिडलेच होते. मग मी त्यांना सांगितलं जरा थांबा माझं ऐका अहो तो थर्माकोलचा सिलिंडर होता असं मी बाळासाहेबांना सांगितलं. मग ठीक आहे असं बाळासाहेब मला म्हणाले.२०१२ मध्ये भाजपाने गॅस सिलिंडरचं आंदोलन गणपतीच्या दिवसात केलं होतं. त्यावेळी गॅसचा दर काय होता? आज काय आहे? बघा. पाच वर्षे लुटायचं आणि दोनशे रुपयांची सूट द्यायची. हे सगळे जुमले आहेत त्यावर यांनी इमले बांधले आहेत जे आपल्याला मोडून काढायचे आहेत.