जळगाव मिरर / २७ एप्रिल २०२३ ।
जळगावच्या जिजाऊ ब्रिगेड यांच्यावतीने जिल्हाधिकारी अमन मित्तल यांना लग्न समारंभातील होणाऱ्या खर्चावर तसेच मरणदारीवर होणाऱ्या अनिष्ठ रूढी परंपरावर बंदी घालणे बाबत निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनावर जिजाऊ ब्रिगेड मार्गदर्शक शिवमती ज्योती पाटील, जिल्हा अध्यक्ष शिवमती लीना पवार, शहर प्रमुख शिवमती मनीषा पाटील, सचिव शिवमती कांचन पाटील, कार्याध्यक्ष शिवमती करुणा गरुड, जिल्हासंघटक शिवमती स्मिता सिसोदे आदींच्या स्वाक्षरी आहेत.

निवेदनात म्हटले आहे की, अलीकडील काळात लग्न समारंभावर होत असलेली प्रचंड पैशांची उधळपट्टी, प्रि वेडिंग सारखा अनाठाई खर्च, लग्न वेळेवर न लागणे तसेच खूप उशिरापर्यंत आलेल्या वऱ्हाडींना ताटकळत थांबावे लागणे त्यामुळे वेळेचा मोठा अपव्यय होतो. त्याचप्रमाणे मरणदारीवर सुद्धा अंधश्रद्धा, अनिष्टरूढी, कालबाह्य परंपरा वाढत चालल्या आहेत. मृत झालेल्या पुरुषांच्या बायकोची (विधवा महिलेची) अंधश्रद्धेतून हेटाळणी केली जाते. यामधुन बहुजन समाजाने यातून बाहेर पडावे यासाठी आवाहन करण्यात आले. बहुजन समाजाला अंधश्रद्धेतून बाहेर काढण्यासाठी तसेच अनावश्यक खर्च टाळण्यासाठी मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष इंजी. पुरुषोत्तम खेडेकर यांनी समाजाला काही मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. लग्न समारंभात मोठ्या प्रमाणावर तरुण पिढी दारू पिऊन डिजेच्या तालावर नाचते. त्यामुळे व्यसनाधींचे प्रमाण वाढत चालले आहे. मोठ्या आवाजात डीजे वाजल्यामुळे हृदयरोगाचे प्रमाण वाढत आहे. कर्णकर्कश डिजेच्या आवाजामुळे लग्न समारंभ परिसरातील नागरिकांना मोठा त्रास होतो. या पार्श्वभूमीवर आपण या सर्व बाबी बंद करण्यासाठी आपण दिनांक १ मे महाराष्ट्रदिनी संपूर्ण महसूल विभागात डिजे मुक्त लग्न, दारूमुक्त वरात, वेळेवर लग्न हे ठराव ग्रामपंचायत मार्फत ग्रामसभेत पास करण्यासाठी आपण प्रशासकीय पातळीवर सूचना कराव्यात अशी मागणी आम्ही मराठा सेवा संघ प्रणित जिजाऊ ब्रिगेडच्या महिला आपणास करत आहोत.
विवाह घरी आपली प्रतिष्ठा जपण्यासाठी वधू-वरांचे पालक आलेल्या तरुण पिढीला मद्यपानाची व्यवस्था करून देतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर तरुण पिढी व्यसनाधीनतेकडे वळत आहे. हे कमी करण्यासाठी विविध सामाजिक राजकीय संघटनांनी पुढाकार घ्यावा. सदर बाबींचे उल्लंघन करणाऱ्या ग्रामपंचायतींवर सक्त कारवाई करण्यात यावी.




















