जळगाव मिरर | २० सप्टेंबर २०२४
राज्यातील अनेक शहरात अल्पवयीन मुलीसोबत अत्याचाराच्या घटना घडत असतांना नुकतीच एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील एका गावात पोटात दुखत असल्याने उपचारासाठी खाजगी रुग्णालयात उपचारासाठी गेलेली अल्पवयीन मुलगी साडेपाच महिन्यांची गर्भवती असल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी गुरूवारी (दि.१९) तिच्या मामाच्या मुलावर केज पोलिस ठाण्यात बाल लैंगिक अत्याचार अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, केज तालुक्यातील एका गावातील दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीच्या पोटात दुखत असल्याने १५ सप्टेंबरला तिची आई तिला केजमधील एका रुग्णालयात घेऊन गेली. त्यावेळी सोनोग्राफीदरम्यान ही मुलगी साडेपाच महिन्यांची गर्भवती असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. पिडीत मुलीच्या मामाच्या मुलाने लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याची माहिती पिडीतेने पोलिसांना दिलेल्या जवाबात म्हटले आहे. याप्रकरणी तिने दिलेल्या फिर्यादीवरून केज पोलिस ठाण्यात बाल लैंगिक अत्याचार अंतर्गत तिच्या मामाच्या मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रकाश शेळके तपास करीत आहेत.