जळगाव मिरर | १७ ऑगस्ट २०२४
गेल्या काही वर्षापासून देशातील अनेक राज्यात रेल्वे अपघाताच्या घटना सातत्याने घडत असतांना नुकतेच वाराणसीहून साबरमतीकडे जाणाऱ्या साबरमती एक्स्प्रेसचे २२ डबे शनिवारी सकाळी उत्तर प्रदेशातील कानपूरजवळ रुळावरून घसरले. ही रेल्वेगाडी कानपूर येथून सुटल्यानंतर काही वेळातच भीमसेनजवळ रुळावरून घसरल्याची घटना घडली. घटनास्थळी पोलीस आणि प्रशासकीय कर्मचाऱ्यांसह आपत्कालीन पथके दाखल झाली आहेत. सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले असून या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव X वरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, “साबरमती एक्स्प्रेसचे इंजिन आज पहाटे २.३५ वाजता कानपूरजवळ रुळावर ठेवलेल्या एका वस्तूला धडकले. यामुळे डबे रुळावरून घसरले. येथे इंजिन धडकल्याच्या तीव्र खुणा आढळून आल्या आहेत. घटनास्थळी मिळालेले पुरावे सुरक्षित ठेवण्यात आले आहेत. या प्रकरणी इंटेलिजन्स ब्युरो आणि उत्तर प्रदेश पोलीसही तपास करत आहेत. प्रवाशांना अथवा कर्मचाऱ्यांना कोणालाही दुखापत झालेली नाही. आमदावादला जाण्यासाठी प्रवाशांसाठी रेल्वेची व्यवस्था करण्यात आली आहे.”
मात्र, हा मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. कानपूर येथून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या गाड्यांसाठी हा महत्त्वाचा मार्ग आहे. भारतीय रेल्वेने कानपूरला जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी बसेस पाठवल्या आहेत. रेल्वेच्या म्हणण्यानुसार, साबरमती एक्स्प्रेस १९१६८ एका दगडाला धडकल्यानंतर रुळावरून घसरली. त्यामुळे इंजिनचे मोठे नुकसान झाले आहे. भारतीय रेल्वे या घटनेचा तपास करत आहे.
दरम्यान, रेल्वेने संबंधित स्थानकांसाठी आपत्कालीन हेल्पलाइन क्रमांक जारी केले आहेत. विरांगना लक्ष्मीबाई झांसी जंक्शन 0510-2440787 किंवा 0510-2440790 यावर संपर्क साधला जाऊ शकतो. ओराईसाठी संपर्क क्रमांक 05162-252206 असा आहे. बांदा येथे 05192-227543 यावर संपर्क साधता येईल आणि ललितपूर जंक्शनसाठी 07897992404 हा हेल्पलाइन क्रमांक आहे.