जळगाव मिरर | १० सप्टेंबर २०२४
राज्यातील अनेक मोठ्या शहरात अपघाताच्या घटना घडत असतांना नुकतेच नागपूर शहरात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुलाच्या नावावर असलेल्या भरधाव ऑडी कारने (एमएच ४० सीवाय ४०४०) काही दुचाकी व चारचाकींना ठोकरले. ही घटना नागपूरच्या रामदासपेठ काचीपुरा ते हाॅटेल सेंटर पाॅइंटच्या दरम्यान रविवारी मध्यरात्री घडली. या प्रकरणी चालकासह दोघांना ताब्यात घेण्यात आले. चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचा संशय व्यक्त होत असून पोलिसांनी त्याला तपासणीसाठी रुग्णालयात पाठवले होते. दरम्यान, बावनकुळेंचा मुलगा संकेत गाडीत होता का याचीही चौकशी केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अपघाताच्या वेळी चालक अर्जुन जितेंद्र हावरे (२४) आणि त्याचा मित्र रोहित चिंतमवार (२७) हे दोघे कारमध्ये होते. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत भरधाव व निष्काळजीपणा गाडी चालवल्याचा गुन्हा दाखल केला. चालक अर्जुन भरधाव गाडी चालवत होता. तो दारूच्या नशेत असल्याचा संशय प्रत्यक्षदर्शींनी व्यक्त केला. अपघातग्रस्त वाहनचालकांनी आरडाओरड केल्यामुळे लोकांची गर्दी जमली. नुकसानग्रस्त कारचा चालक जितेंद्र सोनकांबळे याने सीताबर्डी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यावरून पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल करून अर्जुन हावरे आणि रोहित चिंतमवार या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्यावर भरधाव व निष्काळजीपणे वाहन चालवून अपघात करणे अशी कलमे दाखल केली आहेत.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, ‘ही गाडी माझ्या मुलाच्या नावे आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून व दबाव न घेता पूर्ण चौकशी करावी, दोषींवर कारवाई करावी. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. मी कुठल्याही पोलिस अधिकाऱ्याशी बाेललेलो नाही.’