जळगाव मिरर । १० जानेवारी २०२४
राज्यातील जनतेचे गेल्या वर्षभरापासून शिवसेना कुणाची या निकालाकडे लक्ष लागून होते आज १० जानेवारी रोजी शिवसेनेच्या आमदार अपात्र प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अखेर निकाल दिला आहे. या निकालात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोठा दिलासा मिळाला आहे तर उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.
शिंदे गटाचा दावा राहुल नार्वेकर यांच्याकडून मान्य करण्यात आला आहे. तर उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. एकनाथ शिंदे यांचीच खरी शिवसेना असल्याचं, नार्वेकर यांनी आपल्या निकालात म्हटलं आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल जाहीर करताना ठळक मुद्द्याचं वाचन केलं आहे. निकाल जाहीर करताना नार्वेकर म्हणाले आहेत की, ३४ याचिका या ६ गटात विभागल्या आहेत. याचिका क्रमांक १८ ही तिसऱ्या गटात आहे. चौथ्या गटात याचिका क्रमांक १९चा समावेश आहे. व्हीपचे उल्लंघन केल्याचा त्यात आरोप आहे. पाचव्या गटात बहुमत प्रस्तावात विरोधी मतदान केल्याचे आरोप आहेत.
निकाल वाचताना ते पुढे म्हणाले, २०१८ साली पक्षाच्या घटनेत केलेले बदल याबाबत दोन्ही गटांकडून वेगवेगळे दावे केले जात आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगाकडे असलेल्या घटनेचा आधार मी घेत आहे. प्रथमदर्शनी निवडणूक आयोगाकडे असलेल्या १९९९ सालच्या शिवसेनेच्या घटनेचा आधार घ्यावा लागेल. २०१८ सालची दुरुस्ती ही मान्य करता येणार नाही. नार्वेकर म्हणाले, माझ्यासमोर आलेल्या पुराव्यांनुसार आणि सर्वोच्च न्यायालयाने नमूद केलेल्या मुद्द्यांनुसार शिवसेनेत २१ जून २०२२ पासून दोन गट झाल्याचंसमोर आलं.