जळगाव मिरर | १० ऑगस्ट २०२४
आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्याच्या राजकारणातील वातावरण चांगलेच तापले आहे. मुख्यमंत्री शिंदेंच्या ठाण्यात आज शिवसेना ठाकरे गट आणि मनसेमध्ये मोठा राडा झाला असून मनसैनिकांनी आक्रमक भूमिका घेत उद्धव ठाकरेंच्या ताफ्यातील गाड्यांवर नारळ फेकून मारले. त्यामध्ये ठाकरेंच्या ताफ्यातील अनेक गाड्यांच्या काचा फुटल्याचं समोर आलं आहे. तसेच मनसैनिकांनी ठाकरेंच्या गाडीवर शेण आणि बांगड्याही फेकल्याचे समोर आले. त्यामुळे शिवसेना आणि मनसेमधील वाद वाढला आहे. ठाण्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे.
ठाण्यातील रंगायतन सभागृहात ठाकरे गटाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यासाठी जाताना उद्धव ठाकरे यांच्या गाडीवर मनसैनिकांनी शेण आणि बांगड्या फेकल्या. मनसैनिकांनी उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावर नारळ देखील फेकून मारले. त्यामुळे अनेक गाड्यांचं नुकसान झालेलं आहे. त्यामध्ये काही गाड्यांच्या काचा फुटल्या असून शिवसैनिकही जखमी झाल्याची माहिती आहे.
राज ठाकरे मराठवाड्याच्या दौऱ्यावर असताना त्याचा ताफा अडवून शिवसैनिकांनी त्यांच्यासमोर सुपाऱ्या फेकल्या होत्या. त्याला प्रत्युत्तर मनसेच्या कार्यकर्त्यांनी दिलं. मनसेच्या कार्यकर्त्यांनी थेट उद्धव ठाकरे यांनाच लक्ष्य करत त्यांच्या ताफ्यातील गाडीवर शेण आणि बांगड्या फेकल्याने ठाण्यात वातावरण तापलं आहे. तर स्थानिक शिवसैनिक देखील रस्त्यावर उतरला आहे. मनसेचे 50 ते 60 कार्यकर्ते या ठिकाणी घुसल्याने मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झाला. त्यामध्ये महिला कार्यकर्त्यांची संख्या मोठी होती. मनसेचे कार्यकर्ते ठाण्यातील रंगायतनमध्ये घुसले आणि त्यांनी शिवसेनेचा बॅनरही फाडला. या प्रकारानंतर शिवसैनिकही त्याठिकाणी जमा झाले आणि गोंधळ निर्माण झाला. त्यानंतर पोलिसांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं.