जळगाव मिरर | २५ जुलै २०२४
दारु पिण्यास पैसे देत नसल्याच्या कारणावरुन गावातील तरुण सचिन दिनेश यादव (वय २२, रा. रायपुर कुसुंबा) याला धमकी देत होता. सचिन हा गावातील किरणा दुकानाजवळ बोलत उभा असतांना पैसे मागणाऱ्या तरुणाने त्याच्यासोबत वाद घालून त्याच्यावर चॉपरने हल्ला केला. ही घटना दि. २२ जुलै रोजी घडली. या प्रकरणी मंगळवारी एमआयडीसी पोलिस ठाण्यात दोघाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगावातील एका महाविद्यालयात शिक्षण घेणारा सचिन यादव हा रायपूर कुसुंबा येथे कुटुंबासह राहतो. त्यांच्या गावातील राजकिरण मानसिंग परदेशी हा त्याच्याकडे अधूनमधून दारुसाठी पैशाची मागणी करतो. मात्र पैसे न दिल्याने ‘तुला पाहून घेईल’, अशी धमकी देत होता. दि. २२ रोजी सचिनची आई घरी येत असताना तिला राजकिरण परदेशी या तरुणाने शिवीगाळ केली. त्यानंतर सचिन एका किराणा दुकानाजवळ गावातीलच एका जणासोबत बोलत असताना सचिनच्या आईला शिवीगाळ करणाऱ्यासह दोन जण तेथे आले. त्यांनी वाद घालत एकाने चॉपरने वार केला. तो वार चुकवित असताना सचिनच्या हातांच्या बोटाला दुखापत होऊन रक्तस्त्राव झाला होता. या प्रकरणी सचिन यादव याच्या फिर्यादीवरून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.