जळगाव मिरर | २८ डिसेंबर २०२३
देशामध्ये कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलं असून कोरोनाने पुन्हा सर्वांच्या चिंतेत वाढ केली आहे. अशामध्ये कोरोनामुळे साऊथ फिल्म अभिनेता आणि डीएमडीके नेता विजयकांत यांचे निधन झाल्याची बातमी समोर आली असून कोरोनामुळे अभिनेत्याचा मृत्यू झाल्यामुळे साऊथ फिल्म इंडस्ट्रीला मोठा धक्का बसला आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत विजयकांत यांचे चाहते, सेलिब्रिटी आणि पक्षाचे कार्यकर्ते श्रद्धांजली वाहत आहेत.
तामिळनाडू विधानसभेतील माजी विरोधी पक्षनेते विजयकांत यांना मंगळवारी श्वास घेण्यास त्रास होत असल्याच्या तक्रारीनंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर रुग्णालयात डॉक्टरांच्या निरिक्षणाखाली उपचार सुरू होते. पण प्रकृती आणखी बिघडल्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. पण आज उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे सर्वांना मोठा धक्का बसला.
एमआयओटी रुग्णालयामध्ये विजयकांत यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्या निधनानंतर रुग्णालयाकडून सांगण्यात आले की, ‘निमोनिया झाल्यामुळे त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. कॅप्टन विजयकांत यांना व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आले होते. त्यांना श्वास घेण्यास खूपच त्रास होत होता. मेडिकल स्टाफच्या सर्वोत्तम प्रयत्नांनंतरही २८ डिसेंबर २०२३ च्या सकाळी त्यांचे निधन झाले.’
विजयकांत यांच्या निधनानंतर डीएमडीके पक्षाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट शेअर करत त्यांचे कोरोनामुळे निधन झाल्याची माहिती दिली. विजयकांत यांना कोरोनाची लागण झाली होती आणि त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता, असं देखील पक्षाकडून सांगण्यात आले आहे. यापूर्वी नोव्हेंबरमध्ये विजयकांत यांची प्रकृती खालावल्याने त्यांना चेन्नईच्या एमआयओटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. खोकला आणि घसादुखीमुळे ते १४ दिवस डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली होते. दरम्यान, विजयकांत हे साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेता होते. त्यांचा फिल्म इंडस्ट्रीतला प्रवास खूपच चांगला राहिला आहे. त्यांनी अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांनी साऊथ फिल्म इंडस्ट्रीला १५४ चित्रपट दिले आहेत. फिल्मी प्रवासानंतर त्यांनी राजाकारणात एन्ट्री घेतली. त्यांनी डीएमडीके पक्षाची स्थापना केली. विरुधाचलम आणि ऋषिवंदियम मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत ते दोन वेळा विधानसभेचे सदस्य राहिले होते.