जळगाव मिरर | ८ ऑगस्ट २०२४
गेल्या काही महिन्यापासून राज्यातील गुन्हेगारी प्रवृत्ती मोठ्या प्रमाणात वाढत असून अल्पवयीन मुली व विवाहितेवर अत्याचाराच्या घटनेत वाढ होत असतांना दिसत आहे. नुकतेच नात्याला काळिमा फासणारी अशीच एक संतापजनक घटना नाशिक शहरात घडली आहे. तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर मद्यपी बापानेच अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. घरात कुणी नसल्याची संधी साधत आजारी मुलीवरील अत्याचाराचा व्हिडीओ पीडितेच्या आईच्या हाती लागल्याने या घटनेचा उलगडा झाला आहे. या प्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी बापाला गजाआड केले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार इयत्ता आठवीत शिकणारी १३ वर्षीय अल्पवयीन पीडिता आजारी असल्याने २५ एप्रिल २०२४ रोजी शाळेत गेली नव्हती. त्यादिवशी तिची आई व आजी कामावर, काका आणि आजोबा दवाखान्यात तर भाऊ शाळेत गेला होता. मुलगी घरात आराम करीत असतांना मद्याच्या नशेत आलेल्या संशयित बापाने घरात कुणी नसल्याची संधी साधत आपल्या मुलीस जीवे मारण्याची धमकी देत बलात्कार केला.
या घटनेचा त्याने मोबाईलवर व्हिडीओही बनविला. या विकृतीचा व्हिडीओ तुझ्या आईला दाखविल अशी धमकी दिल्याने मुलीने वाच्यता केली नाही. त्यानंतरही बापाचा अत्याचार सुरूच होता. पीडितेच्या आईच्या हाती नुकताच पतीचा मोबाईल लागल्याने या घटनेचा उलगडा झाला आहे. मुलीला धीर देत तिला विश्वासात घेतल्याने मुलीने आपबिती कथन केल्यानंतर सदर महिलेने आपल्या पती विरोधात पोलीसात धाव घेतली असून अधिक तपास उपनिरीक्षक हाके करीत आहेत.