जळगाव मिरर / १४ फेब्रुवारी २०२३ ।
जगभर आज व्हॅलेंटाईन डे मोठ्या उत्साहात साजरा केला जात असतानाच राजधानी दिल्लीत पुन्हा श्रद्धा हत्याकांडासारखी पुनरावृत्ती झाली आहे. काही दिववासंपूर्वी संपूर्ण देशाला श्रद्धा हत्याकांडाने हादरून सोडले होते. ही घटना ताजी असतानाच आज पुन्हा राजधानीत एका तरूणीची हत्या करून तिचा मृतदेह फ्रिजमध्ये ठेवण्यात आला होता. श्रद्धा हत्याकांडातील आरोपी आफताब सध्या तुरुंगात असून, आफताबने श्रद्धा वालकरची हत्या करून तिच्या शरिराचे तुकडे रेफ्रिजरेटरमध्ये ठेवले होते. त्यानंतर आज पुन्हा प्रेयसीची हत्या करून मृतदेह फ्रिजमध्ये ठेवण्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
दिल्ली पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नजफगडमधील मित्राव गावाच्या हद्दीतील उत्तम नगरमध्ये एक ढाबा आहे. या ढाब्याच्या फ्रिजमध्ये एका महिलेचा मृतदेह फ्रिजरमध्ये आढळून आला आहे. संबधित युवतीची हत्या साधारण दोन ते तीन दिवसांपूर्वी झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी साहिल गेहलोत असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
पोलिसांनी सांगितले की, साधारण दोन ते तीन दिवसांपूर्वी कश्मीरे गेट ISBT जवळ कारमध्ये मुलीची गळा आवळून हत्या करण्यात आली होती. हत्येनंतर आरोपीने मित्राव गावातील त्याच्या ढाब्यावरील फ्रिजरमध्ये मृतदेह लपवून ठेवला. साहिल आणि हत्या झालेली मुलगी गेल्या अनेक दिवसांपासून रिलेशनशिपमध्ये होते. असे असताना साहिलचे लग्न दुसऱ्या मुलीसोबत होणार होते. याला तरुणीचा विरोध होता. याच कारणावरून साहिलने मुलीची हत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. अधिक तपास दिल्ली पोलीस करत आहेत.