जळगाव मिरर | २७ जुलै २०२४
यावल शहरात अंडा आमलेटचे दुकानावर अंडा भुर्जी घेण्याचे कारणावरून ग्राहक व विक्रेत्यामध्ये वादविवाद झाल्याने विक्रेत्याने ग्राहकाच्या डोक्यावर लोखंडी दांड्याचा तावा मारल्याने ग्राहक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. जखमीला ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचारानंतर जख्मीची प्रकृती गंभीर असल्याने त्यास पुढील उपचारासाठी सामान्य रुग्णालय जळगाव येथे हलविण्यात आले आहे. याबाबत यावल पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, येथील बोरावल गेट परिसरात पराग आमलेट सेंटरवर तालुक्यातील पिंप्री येथील सुधाकर ज्ञानेश्वर सपकाळे (वय २६) हा युवक काल सायंकाळच्या सुमारास अंडा भुर्जी घेण्यासाठी गेला असता भुर्जी घेण्यावरून ग्राहक सुधाकर सपकाळे व विक्रेता पराग जगदीश चौधरी यांचेत वादविवाद झाला. पराग चौधरी याने लोखंडी दांड्याचा तावा सुधाकर याचे डोक्यात मारल्याने सुधाकर सपकाळे गंभीर जखमी झाला. त्यास तातडीने येथील ग्रामीण रुग्णालयात आणले असता त्याचेवर प्रथमोपचार केल्या नंतर पुढील उपचारासाठी जळगाव येथे हलवण्यात आले. जखमी सुधाकर याचे काका शरद जनार्दन सपकाळे यांनी येथील पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यावरून पराग चौधरी विरुद्ध यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.