जळगाव मिरर | २५ जुलै २०२४
रात्रीपासून घरातून बाहेर गेलेल्या अनिकेत उर्फ सोनू राजू बनसोडे (वय २७, रा. समता नगर) या तरुणाचा मृतदेह त्याच परिसरातील एका विहरीत मिळून आला. ही घटना बुधवार दि. २४ जुलै रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास विहरीतील पाण्यावर चपला तरंगताना दिसल्याने उघडकीस आली. यावेळी त्याच्या कुटुंबियांनी मनहेलावणारा आक्रोश केला. याप्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील समता नगरात अनिकेत उर्फ सोनू बनसोडे हा तरुण आई व बहिणीसह वास्तव्यास होता. मंगळवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास तो बाहेर जात असल्याचे सांगून हा घराबाहेर पडला होता. रात्री उशिरापर्यंत तो घरी आला नाही. त्यामुळे त्याच्या आईने शोधाशोध सुरू केली. बुधवार दि.२४ जुलै रोजी सकाळी ७ वाजता समता नगरातील विहिरीत चपला तरंगतांना दिसल्या. त्यामुळे या ठिकाणी परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती. पाण्यातील चपला सोनूच्याच असल्याचे त्याच्या आईने ओळखले. त्यानुसार पट्टीच्या पोहणाऱ्यांनी विहिरीत उडी घेऊन पहिल्याच प्रयत्नात सोनूला बाहेर काढले. मुलाचा मृतदेह बघताच सोनूच्या आईने हंबरडा फोडीत आक्रोश केला.
मृतदेह विहरीतून बाहेर काढल्यानंतर परिसरातील तरुणांनी त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी मयत घोषित केले. मुलाचा मृतदेह पाहून आईने हंबरडा फोडला. यावेळी रुग्णालयात नातेवाईकांसह मित्रपरिवाराची मोठी गर्दी झाली होती. याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.