जळगाव मिरर | १८ जुलै २०२४
राज्यातील अनेक शहरातील जंगले कमी होऊ लागली असल्याने वन्यप्राणी भक्ष्याच्या शोधासाठी शेती अन् गावाकडे येऊ लागली आहे. अनेक जंगलांजवळील गावांमध्ये बिबट्या येण्याचे प्रकार अधूनमधून समोर येत असतात. परंतु आता बिबट्यांची धाव मोठ्या शहरांपर्यंत आली आहे. छत्रपती संभाजीनगरात एका बिबट्याची प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. यामुळे गेल्या तीन दिवसांपासून छत्रपती संभाजीनगरातील चार मोठ्या शाळा बंद आहेत. प्रशासनाने बिबट्याच्या दहशतीमुळे या शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगरात अग्निहोत्र चौकाकडून खिंवसरा पार्क, उल्कानगरीकडे जाणाऱ्या रस्त्यावर गर्द झाडी आहेत. हा भाग नागरी वस्तीचा आहे. या भागाच्या जवळच जैन इंटरनॅशनल, गुरुकुल ऑलिम्पिक, पोतदार इंटरनॅशनल या शाळा आहेत. या परिसरात एक बिबट्या दिसून आला. हा बिबट्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला. त्यानंतर गेल्या तीन दिवसांपासून वन विभागातील कर्मचारी त्याचा शोध घेत आहेत. परंतु तो सापडत नाही. यामुळे जैन इंटरनॅशनल, गुरुकुल ऑलिम्पिक, पोतदार इंटरनॅशनल आणि इतर एक या शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. बिबट्याच्या दहशतीने छत्रपती संभाजीनगर शहरातील चार मोठ्या शाळा बंद झाल्याचा प्रकार प्रथमच घडत आहे.
गेल्या तीन दिवसांपासून जैन इंटरनॅशनल, गुरुकुल ऑलिम्पिक, पोतदार इंटरनॅशनल आणि इतर एक शाळा परिसरात बिबट्याची दहशत आहे. त्यामुळे विद्यार्थी शाळेत येत नाहीत. प्रशासनाकडून शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. या भागातील नागरिक भीतीने बाहेर पडणे टाळत आहेत. गेल्या तीन दिवसांपासून बिबट्याचा वावर असताना त्या बिबट्या पकडण्यात अजूनही यश नाही. यामुळे परिसरातील नागरिक दहशतीखाली आहे. तसेच या भागात बिबट्या दिसला, म्हणून सोशल मीडियावर अफवाही सुरु आहेत. सोशल मीडियावरील या पोस्टमुळे नागरिक अजूनच जास्त भीतीखाली आहे.