जळगाव मिरर / ६ फेब्रुवारी २०२३
जानेवारी फेब्रुवारी महिना आणि कोरोनाचे टळलेले सावट यामुळे विद्यार्ध्यांमध्ये उत्साह शिगेला पोहचला असून पहिल्यांदाच महाविद्यालयांचे परिसर वार्षिक स्नेहसंमेलनासाठी सज्ज झाला आहे. के. सी. ई. सोसाटीचे इन्स्टिटूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च ह्या संस्थेत वार्षिक स्नेहसंमेलन शनिवार दि. ४ फेब्रुवारी पासून सुरु झाले आहे. पहिल्या दिवसापासूनच विद्यार्धी आपले विविध कलागुण सादर करण्यासाठी उत्साहात आणि जल्लोषात ह्या समारोहात सामील झाले. आज सिनर्जी च्या दुसऱ्या दिवशी हा उत्साह शिगेला पोहचला.
आज दुसऱ्या दिवशी विद्यार्ध्यांनी वक्तृत्व, वादविवाद, गीतगायन, नृत्य आणि फॅशन शो हे कलाप्रकार सादर करीत कार्यक्रमात चुरस निर्माण केली. सकाळच्या सत्रात वादविवाद आणि वक्तृत्व ह्या उपक्रमात विद्यार्ध्यांनी विविध विषयांवर आपले परखड मत व्यक्त केले. देव देवतांवरील वक्त्यव्यावरून निर्माण झालेले वाद, मोबाईलचा वापर आणि आवश्यक वादविवाद, चित्रपट उद्योग, सोशल मीडिया निर्बंध असे विविध विषय घेत विद्यार्थ्यांनी अभ्यासपूर्णरित्या सादर केले. वादविवाद, वक्तृत्व ह्या कलाप्रकाराचे परीक्षण श्री पंकज व्यवहारे, श्री योगेश महाले व प्रा. विजय लोहार यांनी केले तर कार्यक्रम समन्वयक म्हणून प्रा. संदीप घोडके, प्रा. प्रकाश बारी, तसेच कुणाल पाटील, प्रियांका सोलंकी काम पहिले. ह्यानंतर गीतगायन हा कलाप्रकार सादर करण्यात आला. नव्या जुन्या ह्या सर्वच काळातील गीत संगीताने कार्यक्रमात धमाल आणली. बडे अच्छे लगते हो, जवानी जानेमन, ओ सैय्या, बाई माझी लाडाची, मेरे कॉलेज कि एक लडकी है अशा विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या गाण्यांवर सर्व महाविद्यालयीन तरुणाई बेधुंदपणे थिरकली. गीतगायन ह्या कलाप्रकाराचे परीक्षण सौ. अलका चव्हाण व विशाखा पोतदार ह्यांनी केले. कार्यक्रम समन्वयक म्हणून प्रा. वर्षा पाठक, प्रा. रोहिणी बोडस, प्रा. अंकिता तिवारी तसेच जयश्री पाटील, कल्याणी परदेशी व प्रसाद पांडे जबाबदारी पार पाडली.
दुपारच्या सत्रात नृत्य आणि फॅशन शो रंगला. नृत्य प्रकारात शास्त्रीय, कत्थक तसेच जुन्या नव्या हिंदी मराठी गाण्यांवर सहभागी स्पर्धकांनी भन्नाट नृत्य सादर केले. स्पर्धकांसोबतच प्रेक्षक महाविद्यालयीन तरुणाईने नृत्य करीत जल्लोषपूर्ण वातावरण निर्मिती केली. नृत्य प्रकाराचे परीक्षण डॉ. अपर्णा भट व नेहा जोशी यांनी केले. तर समन्वयक म्हणून डॉ. अनुपमा चौधरी, प्रा. रुपाली नारखेडे तसेच मेघना भोळे, वैष्णवी भावसार, दिपाली वसाने, ध्यानेश्वर चौधरी यांनी जबाबदारी पार पडली.
सर्वाधिक रंगला तो विद्यार्थ्यांचा आवडता कलाप्रकार म्हणजे फॅशन शो. आय. एम. आर. ने आपल्या शैक्षणिक सामाजिक दातृत्वाची जाणीव ठेवत कुठेही शरीर प्रदर्शन किंवा भडक प्रकार न करता फॅशन शो ला सांस्कृतिक कोंदण मिळवून दिले. फॅशन शोचे दोन राऊंड घेण्यात आले त्यात पारंपरिक पोशाख आणि पंचतत्त्व आधारित पोशाखाचे सादरीकरण करण्यात आले. आपल्या संस्कृतीत पंचतत्वाला अलौकिक असे महत्व असून पृथ्वी सकट संपूर्ण विश्वाची निर्मिती ह्या पंचतत्वातून झालेली आहे हि आपल्या संस्कृतीची मान्यता. ह्याच सांस्कृतिक मान्यतेला आधार मानत फॅशन शो ची कल्पना प्रत्यक्षात साकार झाली. पृथ्वी, आग, वायू, जल आणि आकाश ह्या पंचतत्वाच्या आधारावर फॅशन शो चे परिधान विद्यार्थ्यांनी केले. विद्युत रोषणाई, उत्कृष्ट संगीत संयोजन आणि उत्तम वेशभूषा ह्या त्रिवेणी संगमाच्या जोरावर हा फॅशन शो चा सोहळा अप्रतिम आणि नेत्रदीपक असा झाला. फॅशन शो च्या परिक्षणाची जबाबदारी रूपा शाश्त्री, डॉ. अर्चना काबरा, adv. सागर चित्रे, adv. सुरज जहांगीर आणि यामिनी कुलकर्णी यांनी पार पडली. सूत्र संचालन प्रा. पुनीत शर्मा व प्रा. दिपाली पाटील यांनी तर शो समन्वयक म्हणून डॉ. ममता दहात यांनी काम केले.
७ फेब्रुवारीला सिनर्जी च्या शेवटच्या दिवशी विविध कलाप्रकारात प्राविण्य दाखविलेल्या विद्यार्थ्यांचा तसेच शैक्षणिक वर्षात परीक्षा, क्रीडा आणि कला प्रकारात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे. आय. एम. आर. च्या संचालक प्रा. डॉ. शिल्पा बेंडाळे ह्यांच्या मार्गदर्शनाने सिनर्जी २०२३ च्या समन्वयक डॉ. शमा सराफ आणि सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी ह्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी अविरत मेहनत घेत आहेत.
