जळगाव मिरर | २७ नोव्हेबर २०२३
राज्यातील अनेक जिल्ह्यात काल रात्रीपासुन पावसासह गारपीट पडत असल्याने अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे तर शासकीय अधिकारी या पंचनाम्यासाठी काही भागात पोहचले आहे तर दुसरीकडे गोरेगाव येथील मुलाखतीच्या कार्यक्रमात राज ठाकरे यांनी एक मिश्किल टोला देखील यावेळी लगावल्याने राजकीय वातावरणात जोरदार चर्चा रंगू लागली आहे.
राज ठाकरे म्हणाले कि, अचानक पावसाचं काय सुरू झालं ते कोणालाच कळत नाही. कारण सध्या सरकार आणि पाऊस कधी येतील आणि कधी कोसळतील हे कळत नाही, यावेळी त्यांनी पावसामुळे मुलाखत देण्यास नकार दिला. आमच्या डोक्यावर छप्पर आहे. तुमच्या डोक्यावर नाही. पाऊस सुरू आहे. त्यामुळे मी मुलाखत देऊ इच्छित नाही, असं राज ठाकरे म्हणाले.
गोरेगाव येथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. राज ठाकरे यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. पण संध्याकाळी अचानक पावसाने सुरुवात केली. नागरिकांना पावसातच थांबावं लागेल म्हणून राज ठाकरे यांनी मुलाखत देण्यास नकार दिला. त्यावेळी त्यांनी सरकार आणि पाऊस कधी कोसळेल हे सांगता येत नाही, असा चिमटा काढला. त्यामुळे उपस्थितांमध्ये एकच खसखस पिकली.