जळगाव मिरर / १५ फेब्रुवारी २०२३ ।
जगभरासह महाराष्ट्रातील तमाम शिवप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. दिल्लीमधील ऐतिहासिक आग्रा येथील लाल किल्ल्यात येत्या १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती साजरी होणार आहे.
आग्रा येथील किल्ल्यात शिवजयंती साजरी करण्यास पुरातत्व विभागाकडून परवानगी देण्यात आली आहे. औरंगाबाद येथील अजिंक्य देवगिरी फौंडेशनचे अध्यक्ष विनोद पाटील आणि महाराष्ट्र सरकार संयुक्त विद्यामाने या कार्यक्रमाचे आयोजन करणार आहेत. आग्रा येथील किल्ल्यात होणाऱ्या या शिवजयंती सोहळ्याला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्य, महाराष्ट्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
आग्र्याच्या लाल किल्ला परिसरात शिवजयंती साजरी करणार असल्याचं महाराष्ट्रातील खासगी संस्थेनं जाहीर केलं होतं. पण पुरातत्व विभागानं यावर आक्षेप घेतला होता. यानंतर या संस्थेनं दिल्ली हायकोर्टात धाव घेतली होती. यानंतर कोर्टानं यावर निर्णय देताना जर राज्य सरकार या संस्थेसोबत सहआयोजक होण्यास तयार असेल तर हा शिवजयंती सोहळा साजरा करण्यास हरकत नाही, असं म्हटलं होतं. यानंतर महाराष्ट्र सरकार यासाठी सहआयोजक होण्यास तयार आहे. त्यामुळं लाल किल्ल्यावर शिवजयंतीचा मार्ग मोकळा झाला आहे.