जळगाव मिरर | १२ जुलै २०२४
चोपडा शहरातील श्रीराम नगर भागात नातेवाईकाच्या हळदीच्या कार्यक्रमात बँडच्या तालावर नाचत असतांना जळगावच्या रामेश्वर कॉलनीत राहणाऱ्या ३१ वर्षीय मयूर राजेंद्र शिंदे याचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना १० रोजी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, शिरपूर तालुक्यातील गरताड येथील मूळ रहिवासी व जळगाव शहरातील मेहरूण येथील रामेश्वर कॉलनीत राहणारे मयूर राजेंद्र शिंदे हे १० रोजी नातेवाईकाच्या लग्नानिमित्त शहरातील श्रीराम नगर येथे आले होते. त्याठिकाणी हळदीच्या कार्यक्रमात मयूर नृत्य करत असताना अचानक त्याच्या छातीत दुखू लागल्याने ते खाली कोसळले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. यानंतर नातेवाईकांनी तातडीने त्यांना चोपडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. परंतु डॉ. सागर पाटील यांनी त्यांना मयत घोषित केले. डॉ. सागर पाटील यांच्या खबरीवरून चोपडा शहर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पो.हे.कॉ. शेषराव तोरे करत आहेत. मयूरच्या पश्चात पत्नी, आई, वडील, बहीण, भाऊ, मुले असा परिवार आहे.