जळगाव मिरर | २१ जुलै २०२४
देशातील श्री केदारनाथ धामकडे अनेक भाविक जात असतांना नुकतेच एक मोठी घटना घडली आहे. उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग जिल्ह्यातील भगवान शंकराचे अकरावे ज्योतिर्लिंग श्री केदारनाथ धामकडे जाणाऱ्या पदपथावर रविवारी पहाटे दरड कोसळली. या दुर्घटनेत अनेक भाविक ढिगाऱ्याखाली गाडले गेल्याचे वृत्त आहे. घटना समजताच बचाव कार्य सुरू करण्यात आले. यादरम्यान तीन मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. इतरांचा शोध सुरू आहे.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नंदन सिंह राजवार यांनी सांगितले की, रविवारी सकाळी 7.30 च्या सुमारास आपत्ती नियंत्रण कक्षाला माहिती मिळाली की केदारनाथ यात्रा मार्गावर दरड कोसळली. या दुर्घटनेत अनेक यात्रेकरू गाडले गेले. माहिती मिळताच एनडीआरएफ, डीडीआर, वायएमएफची पथके घटनास्थळी पोहोचून मदतकार्य सुरू करण्यात आले. बचाव पथकाने ढिगाऱ्यातून तीन जणांचे मृतदेह बाहेर काढले. अन्य आठ जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.