
जळगाव मिरर | १८ जानेवारी २०२५
राज्यातील अनेक शहरात गुन्हेगारीच्या घटना सुरूच असतांना पुणे देखील गुन्हेगारी घटनेने नेहमीच चर्चेत येत असतांना एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे.
बायकोला सोडून माझ्याबरोबर राहा, तुझ्या मुलाचे माझ्या मुलीशी लग्न करून दे आणि 30 लाख रुपयांची परतफेड कर, अन्यथा सूसमधील फ्लॅट नावावर कर, या कारणांवरून, अनैतिक संबंधांतून एका महिला वकिलाने आपल्यासमोर लॉजमध्ये एकाला आत्महत्या करायला भाग पाडले. अंकुश डांगे (वय 45, रा. बालेवाडी) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी अंकुश डांगे यांच्या पत्नीने बंडगार्डन पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी माढा तालुक्यातील 42 वर्षांच्या महिला वकिलावर गुन्हा दाखल केला आहे.
ही घटना पुणे स्टेशनसमोरील होम लँड लॉजमध्ये 9 जानेवारी रोजी घडली. अंकुश डांगे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली, तेव्हा ही महिला वकील तेथे उपस्थित होती. या महिला वकिलाचा नवरा न्यायाधीश असून, त्यांना यांच्यातील अनैतिक संबंधांची कल्पना होती, असे पोलिसांनी सांगितले. आरोपी महिला वकील व अंकुश डांगे यांची व्यवसायातून ओळख झाली. त्यातून मैत्री व प्रेमसंबंध निर्माण झाले. आरोपी महिला वकिलाने 9 जानेवारी रोजी अंकुश डांगे यांना होमलँड लॉजमध्ये बोलावून घेतले.
पत्नी व मुलीला सोडून दे व माझ्याबरोबर राहा, नाहीतर आत्महत्या कर, असे तिने अंकुश डांगे यांना सांगितले. तेव्हा अंकुश डांगे यांनी तिच्यासमोर गळफास घेऊन आत्महत्या केली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक गणेश चव्हाण करत आहेत.