जळगाव मिरर / २८ जानेवारी २०२३
2024 च्या लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सगळेच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. सत्ताधारी भारतीय जनता पार्टी तिसऱ्यांदा सत्तेवर येण्यासाठी प्रयत्नशील असून त्यांनी गेल्याच पंधरवड्यात तशी आखणी करून कामही सुरू केले आहे.
या सगळ्यात आज निवडणुका झाल्या तर कोणाला काय मिळेल याचे थेट आकडेच एका सर्वेक्षणात समोर आले आहेत. त्यानुसार भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी बहुमताच्या किंचित वर जाण्यात कदाचित यश मिळवेल. मात्र त्यांच्या पन्नासपेक्षा जास्त जागा कमी होताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी कॉंग्रेसचे नेते शशी थरूर यांनीही असेच भाकित केले होते.
सी वोटर आणि इंडिया टुडेने हे सर्वेक्षण केले आहे. भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला 543 पैकी 298 जागा मिळतील असा अंदाज त्यांनी वर्तवला आहे. कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडीला 153 तर अन्य पक्षांना 91 जागा मिळतील असे भाकित वर्तवण्यात आले आहे. 2019 मध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीला 353 जागा मिळाल्या होत्या. त्या तुलनेत आता त्यांच्या 55 जागा कमी होताना दिसत आहेत. गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात असेच सर्वेक्षण सी वोटरने केले होते. तेव्हाही रालोआला 307 जागा मिळण्याचे अनुमान वर्तवण्यात आले होते. त्यापेक्षाही आता 9 जागा कमी दाखवल्या जात आहेत.