जळगाव मिरर | १० नोव्हेबर २०२३ | देशभर दिवाळीच्या सणाची लगबग सुरु झालेली आहे तर आज धनत्रयोदशी हा उत्सव साजरा होणार आहे. या सणाला सोन्यासह चांदीच्या खरेदीला विशेष महत्व दिले आहे. यासह ग्राहकांनी देखील सोन्यासह चांदीच्या खरेदीसाठी बाजारात मोठी गर्दी केली आहे. धनत्रयोदशी पूर्वसंध्येला सोने- चांदीच्या भावात पुन्हा घसरण झाली असून, ग्राहकांना खरेदीची सुवर्णसंधी मिळाली आहे.
सोन्याच्या भावात गुरुवारी ४०० रुपयांची घसरण होऊन ते ६० हजार ७०० रुपये प्रतितोळ्यावर आले. यामुळे सोने ६१ हजार रुपयांच्या आत आले आहे, तसेच चांदीच्याही भावात ५०० रुपयांची घसरण झाली व ती ७१ हजार ५०० रुपये प्रतिकिलोवर आली आहे. नवरात्रोत्सवापासून सुरू असलेला सुवर्णखरेदीचा उत्साह अद्यापही कायम आहे. धनत्रयोदशीच्या पूर्वसंध्येला बाजार गजबजून गेले होते.
धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर पूजनासाठी ग्राहकांनी श्रीगणेशासह लक्ष्मीच्या प्रतिमा असलेली चांदीची नाणी खरेदी करण्यावर भर दिला आहे. चांदीच्या नाण्यांची रक्कम ३०० रुपयांपासून सुरु असून, ग्राहक लक्ष्मीची छोटी प्रतिमाही विकत घेत आहेत.