जळगाव मिरर / २४ जानेवारी २०२३
देशातील गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत असले तरी यातील गुन्हेगार हे अशिक्षित असतातच असे नाही तर उत्तम शिक्षण घेतलेले लोक हि गुन्हेगारीच्या घटनेत आढळून आले आहे. नुकतेच एका व्यक्तीने आपली कंत्राटी नोकरी वाचविण्यासाठी आपल्या ५ महिन्याच्या मुलीला कालव्यात फेकल्याची संतापजनक घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.
राजस्थानच्या बीकानेर जिल्ह्यात सरकारी नोकरीसाठी 5 महिन्यांच्या मुलीला कालव्यात फेकल्याची घटना घडली आहे. संतापजनक म्हणजे या कोवळ्या मुलीला तिच्या आई-वडिलांनीच सरकारी नोकरी वाचवण्यासाठी कालव्यात फेकले. वडील झंवरलाल यांनी कंत्राटी नोकरी वाचवण्यासाठी आपली मुलगी अंशिका उर्फ अंशुला ठार मारले. पोलिसांनी आरोपी आई-वडिलांच्या मुसक्या आवळल्या आहेत. आरोपींनी मुलीला कालव्यात फेकताना काही लोकांनी पाहिले. ते धावत तिथे पोहोचले. त्यांनी मुलीला बाहेर काढले. पण ती वाचली नाही. तोपर्यंत दुचाकीस्वार पळून गेले होते.
बीकानेरच्या छत्तरगड ठाणे हद्दीत ही घटना घडली आहे. झंवरलाल चांडासर गावातील विद्यालयात सहाय्यक पदावर नोकरीला आहेत. पोलिस अधीक्षक योगेश यादव यांनी सांगितले की, झंवरलाल यांना तिसऱ्या अपत्यामुळे आपली नोकरी जाण्याची भीती वाटत होती. त्यामुळे त्यांनी आपल्या पत्नीच्या संगनमताने आपल्या तिसऱ्या मुलीला ठार मारण्याचा कट रचला. दोन दिवसांपूर्वी ते छत्तरगड स्थित आपल्या मेहुण्याच्या घरी गेले. रविवारी सायंकाळी 4 सीएचडी स्थित मेहुण्याच्या घरून पुन्हा दियातराकडे परत येताना रस्त्यात मुलीला कालव्यात फेकून दिले. तेथून ते पुन्हा दियातराकडे रवाना झाले.
झंवरलाल दुचाकीवर आपली पत्नी व 2 मुलांसोबत गेला होता. रविवारी सायंकाळी 5 च्या सुमारास या दाम्पत्याने आपल्या 5 महिन्यांच्या मुलीला इंदिरा गांधी नहर प्रोजेक्टमध्ये (आयजीएनपी) फेकले. ते पाहून काही नागरिकांनी आरडाओरडा केला. त्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. पण तोपर्यंत झंवरलाल व त्यांची पत्नी दुचाकीवरून पसार झाली. लोकांनी मुलीला कालव्यातून बाहेर काढले. पण तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता. या घटनेची माहिती मिळताच छत्तरगड व खाजूवाला भागात नाकाबंदी करण्यात आली. तिथे खाजूवालाचे ट्रेन सब इन्स्पेक्टर मुकेश कुमार यांनी दाम्पत्याची दुचाकी रोखली. चौकशी केली असता झंवरलालने आपण मेहुण्याच्या घरून येत असल्याचे सांगितले. त्यावर मुकेश कुमार यांना या दाम्पत्यावर संशय आला. त्यांनी त्यांची फोटो काढली. दुचाकीचाही फोटो काढला. झंवरलालच्या आधार कार्डाचाही फोटो घेतला. त्यानंतर त्याला पुढे जाऊ देण्यात आले. वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी दियातराच्या झंवरलालची माहिती काढली. त्यानंतर या दाम्पत्याला अटक करण्यात आली.