जळगाव मिरर | २७ ऑगस्ट २०२४
राज्यातील अनेक जिल्ह्यात पाऊस सुरु असून उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार व नाशिक जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे नदी-नाल्यांना पूर आला आहे. नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा व धडगाव तालुक्यात पुरात तीन जण वाहून गेले आहेत. यातील दोघांचे मृतदेह हाती लागले असून एकाचा शोध सुरू आहे. मृतांमध्ये बर्डी आश्रमशाळेतील रोजंदारी शिक्षकाचा समावेश आहे. तसेच जिल्हाभरात ४२ घरांची अंशतः पडझड झाली आहे. जळगाव जिल्ह्यातील हतनूर धरण पूर्णपणे भरले आहे. सोमवारी दुपारी २ वाजता या धरणाचे १६ दरवाजे पूर्ण उघडण्यात आले असून तापी नदी दुथडी वाहत अाहे.
धरणाच्या १६ दरवाजांतून ६० हजार ८८३ क्युसेक वेगाने विसर्ग सुरू होता. चाळीसगावचे गिरणा धरण दोन दिवसांत शंभर टक्के भरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुसळधार पावसाने नवापूर शहरातील रंगावली नदीला सोमवारी पूर आला आहे. सुरत-नागपूर राष्ट्रीय महामार्ग सहाच्या मधोमध मोठमोठ्या खड्ड्यात वाहने फसल्याने वाहतूक कोंडी झाली होती.