जळगाव मिरर | ७ ऑगस्ट २०२४
राज्यातील अनेक शहरात धक्कादायक घटना घडत असतांना नुकतेच बुलढाणा येथून अशीच काही धक्कादायक बातमी समोर आली आहे. आजच्या आधुनिक जगातही अंधश्रद्धेच्या घटना वारंवार घडत असून नरबळी दिला जातोय. असाच एक प्रकार महाराष्ट्रात घडलं आहे. पैसे मिळवण्याच्या उद्देशाने बुलढाण्यात नरबळीचा प्रकार घडला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील नागझरी येथील कृष्णा कराळे या 14 वर्षीय विद्यार्थ्याचं अपहरण करून त्याची हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तपासा दरम्यान पोलिसांच्या हाती लागलेल्या सीसीटीव्ही फुटेजमधून अनेक गोष्टी उघडकीस आल्या. घटनेच्या दिवशी सकाळी कृष्णा नागझरी येथील रुपेश वारोकार या तरुणाच्या मोटार सायकलवर बसून कुठेतरी जात असल्याचं दिसून आलं. विशेष म्हणजे हाच रुपेश वारोकर कृष्णाच्या अपहरणाची तक्रार देण्यासाठी कृष्णाच्या कुटुंबीयांसोबत पोलीस स्टेशनमध्ये देखील हजर होता. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. त्यांनी रुपेशची चौकशी केली असता हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. शेवटी आरोपीने कृष्णाची हत्या करून त्याचा मृतदेह भास्तनच्या जंगलात ठेवल्याची कबुली दिली.
कृष्णाचा गळा आवळून त्याची हत्या करण्यात आली. यानंतर हातोड्याने त्याच्या डोक्यावरही वार करण्यात आले होते. रुपेश वारोकार यानेच कृष्णाच्या हत्येची कबुली दिली आहे. हत्येनंतर त्याचा मृतदेह रानात फेकून देण्यात आला. दुसऱ्या दिवशी एका गावकऱ्याला रानात कृष्णाचा मृतदेह दिसला. त्यांनी पोलीस ठाण्यात याबाबत माहिती दिली. चौकशीअंती रुपेश वारोकार यानेच त्याची हत्या केल्याचं उघड झालं. कुटुंबीयांनी कृष्णाच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केला. मात्र दुसऱ्याच दिवशी कृष्णाच्या अंत्यसंस्काराच्या ठिकाणी स्मशानात लिंबू, हात-पाय तोडलेली बाहुली, धागे-दोरे, दारूची बाटली आणि पुजेचे साहित्य दिसून आले. कृष्णाच्या अत्यंविधीच्या ठिकाणी लिंबू, धागे-दोरे आणि इतर पुजेचं साहित्य आढळून आल्याने ही हत्या अघोरी पुजेसाठी केल्याचं उघडकीस आलं. यामध्ये नरबळीचा प्रकार घडल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र हे सर्व कोणी केलं याबाबतची माहिती मिळू शकलेली नाही.