जळगाव मिरर | २ ऑगस्ट २०२४
राज्यातील अनेक शहरात धक्कादायक घटना घडत असतांना नुकतेच १ ऑगस्ट रोजी वर्धा येथे काही दिवसांपासून तणावात असलेल्या युवतीने वैद्यकीय महाविद्यालयाच्या तिसऱ्या माळ्यावरून उडी घेत आत्महत्या केली. ही घटना १ ऑगस्टला दुपारी सावंगी (मेघे) येथील वैद्यकीय महाविद्यालयात घडली. पूजा अरुण राजानी (२२, रा. नागपूर) असे आत्महत्या केलेल्या युवतीचे नाव आहे.
सविस्तर वृत्त असे कि, पूजा सावंगी मेघे येथे जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएसच्या दुसऱ्या वर्षाला होती. नियमानुसार परीक्षेला बसण्यासाठी ७५ टक्के उपस्थिती अनिवार्य आहे. महाविद्यालयाच्या नियमानुसार तिची हजेरी कमी होती. त्यामुळे परीक्षेला बसू देणार नसल्याचे प्राचार्यानी तिला सांगितले होते. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिस तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वैद्यकीय महाविद्यालय गाठले.
प्राचार्यांनी तिला परीक्षेला बसू देणार नाही, अशी तंबी दिली होती. तीन लाख रुपये भरा, नंतरच परीक्षेला बसण्यास सांगितले होते, असा आरोप पूजाची आई व मामाने केला. तर पूजाने मानसिक तणावातून टेरेसवरून उडी घेतली, असे महाविद्यालयाचे विशेष कार्य अधिकारी अभ्युदय मेघे यांनी सांगितले.