जळगाव मिरर / १८ फेब्रुवारी २०२३ ।
गेल्या आठ महिन्यापासून राज्यातील शिवसेना कुणाची यावर मोठा वाद न्यायालयात सुरु होता. त्यावर शुक्रवारी अखेर पडदा पडला असून शिवसेना एकनाथ शिंदेंचीच घोषित झाल्यानंतर अनेक नेत्यांनी ठाकरे गटाला डीवचल आहे. त्यात आता आणखी एका नेत्याची भर पडली आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना थेट रामायणातील दाखला दिल्याचं दिसून आलं आहे. या संदर्भातील एक पोस्ट देखील त्यांनी आपल्या फेसबुकवर शेअर केली आहे.
यावेळी राजू शेट्टी म्हणाले, ‘रावण धनुष्य उचलू शकला नाही, त्याचा अपमान झाला… नंतर त्याने सीता पळवली आणि रामायण घडलं. मात्र कलयुगातील रावणानं त्यातून बोध घेतला आणि आधी रामायण घडवलं… मग सत्ता पळवली आणि शेवटी मायावी शक्तीने धनुष्यही उचललं. आता मतदार श्रीरामाच्या रुपात येतील त्यावेळीच हे रामायण पूर्ण होईल.’ या आशयाची पोस्ट राजू शेट्टी यांनी केली आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांना मिळेल, असा निकाल दिला आहे. उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा मोठा धक्का आहे, तर एकनाथ शिंदे यांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे. त्यामुळे सध्या शिंदे गटात आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
