
जळगाव मिरर | २ डिसेंबर २०२४
राज्यातील विधानसभा निवडणुकीत यंदा महायुतीला मोठे यश आले आहे मात्र अद्याप सत्ता स्थापन झाली नसल्याने विरोधक आता महायुतीवर टीकास्त्र सोडत आहे. राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री शिंदे गावी गेले होते. गृह खात्याची मागणी मान्य होत नसल्याने नाराज होऊन अापल्या गावी दरे (जि. सातारा) येथे गेलेले काळजीवाहू मुख्यमंत्री दोन दिवसांनंतर मुंबईत परतले. शनिवारी तब्येत ठीक नसल्याने त्यांनी आराम केला.
मात्र सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग येत असल्याने अंगातील ताप झटकून शिंदे रविवारी दुपारी ५ वाजता ठाण्यात परतले. तेथील निवासस्थानातूनच शिंदे भाजपच्या हालचालींवर लक्ष ठेवून होते. शनिवारी मुंबईच्या डॉक्टरांनी शिंदेंवर उपचार केले. रविवारी त्यांची तब्येत थोडीशी ठीक झाली. यानंतर ग्रामदैवताचे दर्शन करून शिंदे मुंबईकडे निघाले. तत्पूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधून नाराजीच्या चर्चेचे खंडन केले. मात्र ‘आपण जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आहोत’ हे सांगण्यास ते विसरले नाहीत. दरम्यान, रविवारी भाजपच्या गोटात मात्र शांतता होती. माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस हेच आमचे मुख्यमंत्री असा दावा केला.
‘ ९० ते १०० जागा आल्या असत्या हा गुलाबरावांचा गोड गैरसमज आहे. महायुती म्हणून आपण एकत्र निवडणूक लढलेलो आहोत आणि आताही आपण एकत्र राहिले पाहिजे. शेवटी अजित पवार यांनी घेतलेली मेहनतही दुर्लक्षित करता येणार नाही. चांगल्या पद्धतीने आपण सत्ता आणल्यावर अशा प्रकारे महायुतीत कोणीही मिठाचा खडा टाकू नये.’
भाजपचे निवडणूक व्यवस्थापन प्रमुख रावसाहेब दानवे म्हणाले, ‘सगळं ठरल्याप्रमाणेच होणार आहे. वेळही ठरवली आहे, तारीखही ठरवली आहे. जो कोणी आमचा नेता निवडला जाईल तो आमचा मुख्यमंत्री असेल. सगळं ठरलं आहे, बॉसचा शिक्का झाला की सगळं समजेल. उद्धव ठाकरे सोबत असते तर आज जेवढे बहुमत मिळाले आहे त्यापेक्षा जास्त बहुमत मिळाले असते. तेव्हा काँग्रेस व राष्ट्रवादीसोबत शिवसेना गेली नसती तर २०१४ ते २०१९ या काळात जसे सरकार चालवले गेले तसेच ते आताही सुरू असते. या कारभाराच्या जोरावर आम्हाला याहूनदेखील अधिक जागा मिळाल्या असत्या,’ असे म्हणत दानवे यांनी मित्रपक्षांना डिवचले.