जळगाव मिरर | १६ जुलै २०२६
भुसावळ तालुक्यातील कुऱ्हा गावाजवळ भरधाव कारने समोरून येणाऱ्या रिक्षेला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात वरणगावातील २८ वर्षीय रिक्षाचालकाचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. मंगळवारी दुपारी घडलेल्या या अपघातामुळे वरणगाव परिसरात हळहळ व्यक्त होत असून, भुसावळ तालुका पोलिसांनी कारचालकाविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वरणगाव येथील सिद्धेश्वर नगरातील प्रकाश जुलाल गायकवाड (वय ५७) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जळगाव तालुक्यातील खेडी बुद्रुक येथील मनीष अदिनाथ संघवे (वय ४३) याच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही घटना १४ जुलै रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास कुऱ्हा गावाजवळील पेट्रोल पंपासमोर घडली. मनीष संघवे हा महिंद्रा कंपनीची कार (एमएच-१९ सीव्ही-७०८१) भरधाव वेगाने चालवत होता. त्याचवेळी समोरून येणारी रिक्षा (एमएच-२० ईके-३४४०) यांना कारने समोरासमोर जोरदार धडक दिली.
या भीषण धडकेत रिक्षाचालक हर्षल प्रकाश गायकवाड (वय २८, रा. सिद्धेश्वर नगर, वरणगाव) गंभीर जखमी झाले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांच्या प्रयत्नांनंतरही उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. या अपघातात रिक्षाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून कारचेही नुकसान झाले आहे. अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. माहिती मिळताच भुसावळ तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून वाहतूक सुरळीत केली.
या प्रकरणी भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात कारचालक मनीष अदिनाथ संघवे याच्याविरुद्ध निष्काळजीपणे व भरधाव वाहन चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक नीलेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार धिरज मंडलीक करीत आहेत.
हर्षल गायकवाड यांच्या अकाली निधनामुळे गायकवाड कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, वरणगाव परिसरात शोककळा पसरली आहे. या घटनेनंतर भरधाव वाहनांवर नियंत्रण ठेवण्याची आणि महामार्गांवर वाहतूक नियमांची कठोर अंमलबजावणी करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.




















