जळगाव मिरर | २ ऑगस्ट २०२४
राज्यातील अकोला शहरात मनसेच्या कार्यकर्त्यांनी अजित पवार गटाचे आ.अमोल मिटकरी यांच्या गाडीवर हल्ला केल्यावर मनसे व अजित पवार गटाच्या नेत्यामध्ये वाक्ययुद्ध सुरु झाले असून आता मनसे नेते अमेय खोपकर यांनी सिंधुदुर्ग येथील एका मेळाव्यात ‘मिटकरींनी तोंड बंद ठेवले नाही तर त्यांना त्यांचे कपडे काढून मारू’ अशी जाहीर धमकी दिली आहे. दरम्यान, हल्लेखोरांपैकी जय मालोकर या तरुणाचा हृदयविकाराने मृत्यू झाला. त्यामुळे राज ठाकरेंवर मनुष्यवधाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी अजितदादा गटाचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली. मालोकरच्या कुटुंबाची अमित ठाकरेंनी भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.
दरम्यान, मिटकरींनी मुलगी, भावासोबत ग्रामीण पोलिस अधिक्षक कार्यालयाच्या पायऱ्यांवर धरणे आंदोलन केले. आपण राज ठाकरेंना सुपारीबाज असे म्हटलोच नाही, असा दावाही त्यांनी केला. हल्ला प्रकरणात १३ पैकी ३ आरोपींना जामीन मिळाला. चौघांना गुरुवारी ताब्यात घेण्यात आले. मात्र, हल्लेखोरांना पळून जाण्यासाठी काही पोलिस अधिकाऱ्यांनी मदत केल्याचा आरोपही मिटकरींनी केला. ते म्हणाले की, महायुती, महासत्ता, आमदारकी व राजकारण गेलं चुलीत. हल्लेखोर मोकाट आहेत. पोलिस अधिकारी त्यांना भेटतात मात्र अटक करत नाहीत, असा आरोपही त्यांनी केला.