
जळगाव मिरर | १९ जानेवारी २०२५
चाळीसगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात ट्रकचालकाने दिलेल्या धडकेत ६२ वर्षीय वृद्धाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली. यामुळे दुर्दैवी घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगाव तालुक्यातील तळेगाव येथील ६२ वर्षीय वृद्ध ज्ञानेश्वर ईश्वर सूळ हे आज शनिवार बाजाराचा दिवस असल्याने बाजार करण्यासाठी चाळीसगाव येथे आले होते. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील सर्कलजवळ त्यांना ट्रकने धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. मुख्य चौकात घडलेल्या या घटनेमुळे घटनास्थळी लागलीच मोठा जमाव जमल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.
घटनेचे गांर्भिय ओळखून तत्काळ वाहतूक शाखेचे पोलीस तसेच शहर पोलीस ठाण्यातील पोलीस दाखल झाले. त्यानंतर मयत ज्ञानेश्वर सूळ यांना तत्काळ शासकीय रुग्णालयाच्या ट्रॉमा सेंटरमध्ये हलवून वाहतूक सुरळीत केली. दरम्यान, या घटनेमुळे गेल्या अनेक दिवसांपासून येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सिग्नल बसवावेत व ब्रेकर टाकावेत, अशी नागरिकांकडून होत असलेली मागणी आज पुन्हा जोर धरु लागली आहे. दरम्यान, गेल्या २ महिन्यात याच ठिकाणी हा दुसरा अपघात झाल्याने नागरिकांकडून त्वरित सिग्नल बसवण्याची मागणी होत आहे