जळगाव मिरर | २६ जुलै २०२४
चोपडा शहरातील अरुणनगर येथील रहिवासी असलेल्या सुनील दिलीप बडगुजर (वय ३५) या तरुणाने राहत्या घरी छताच्या पंख्याला साडीच्या सहाय्याने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवल्याची घटना २५ रोजी सकाळी १०० वाजेच्या सुमारास उघडकीस आली.
मिळालेल्या माहितीनुसार, मयत सुनील बडगुजर हा प्लम्बिंगचा व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करत होता. २५ रोजी सुनील घरी एकटाच होता. त्याच्या घरातील भाडेकरू यांनी सुनील अजून बाहेर का आला नाही, म्हणून सुनीलच्या घराचा दरवाजा ठोठावला. परंतु, त्यांनी दरवाजा उघडलाच नाही. त्यामुळे त्यांनी लागलीच फोन वरून सुनीलचे मोठे बंधू अनिल बडगुजर यांना ही माहिती सांगितली. त्यानंतर अनिल यांनी घराचा दरवाजा उघडला असता सुनीलने छताच्या पंख्याला साडीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केल्याचे २५ रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास उघडकीस आले. त्यानंतर नातेवाईकांनी त्यांना चोपडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. परंतु, डॉ. स्वप्ना पाटील यांनी सुनीलला मृत घोषित केले.
मृत सुनील बडगुजर यांच्यावर २६ रोजी चोपडा येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. डॉ. स्वप्ना पाटील यांच्या खबरीवरून चोपडा शहर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सुनीलच्या पश्चात पत्नी, २ मुली, आई, भाऊ असा परिवार आहे. सुनीलने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले, हे मात्र कळू शकले नाही.