
जळगाव मिरर | १५ जानेवारी २०२५
राज्यातील अनेक ठिकाणी अपघाताच्या मालिका सुरु असतांना मुंबईत पुन्हा एकदा वेगवान गाड्यांचा कहर दिसून आला आहे. नवी मुंबईतील तळोजा एमआयडीसी परिसरात मंगळवारी सकाळी 9.46 वाजता एका पुरुष आणि महिलेला कारने धडक दिली.
या घटनेत एका जखमीचा मृत्यू झाला असून दुसऱ्याची प्रकृती चिंताजनक आहे. या धडकेची घटना तिथे लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. त्याचा 25 सेकंदाचा व्हिडिओ समोर आला आहे. एक महिला मोबाईलवर बोलत असल्याचे दिसत आहे. ती थोडं पुढे गेल्यावर तिला एक तरुण तिच्या जवळून जाताना दिसला. दरम्यान, भरधाव वेगात आलेल्या कारने पुरुष आणि महिलेला धडक दिली. हा अपघात एवढा भयानक होता की, स्त्री-पुरुष कित्येक फूट दूर उडाले. तर गाडी पुढे जाते आणि दुसऱ्या कारला धडकून थांबली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कार चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. यात एकाचा मृत्यू झाला असून, दुसऱ्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.