
जळगाव मिरर | ९ जुलै २०२४
कुटुंबियांसह उज्जैन येथे देवदर्शनासाठी गेलेल्या सौभाग्य चित्तरंजन सेनापती (वय २८) या फोटोग्राफरच्या घरात चोरयांनी हातसफाई केली. ही घटना दि. २ ते दि. ६ जुलै दरम्यान, कुसुंबा तालुक्यातील सदगुरु बैठक हॉल येथे घडली. याठिकाणाहून चोरट्यांनी सोन्याच्या दागिन्यांसह रोकड असा एकूण २ लाख ६८ हजार ६०० रुपयांचा ऐवज चोरुन नेला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील कुसुंबा गावात सौभाग्य सेनापती हे फोटोग्राफर वास्तव्यास आहे. दि. २ जुलै रोजी ते कुटुंबियांसह उज्जैन येथे देवदर्शनासाठी गेले होते. दि. ६ जुलै रोजी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास ते घरी परत आले असता, त्यांना घराच्या दरवाजाचे कुलूप तुटलेले होते तर बाहेरु न दरवाजाला कडी लावलेली होती. त्यांनी दरवाजाची कडी उघडून घरात प्रवेश केला, त्यानंतर वरच्या मजल्यावर जावून पाहणी केली. यावेळी त्यांना बेडरुममधल्या कपाटात ठेवलेले पैसे आणि सोन्याचे दागिने दिसून आले नाही. त्यांनी संपुर्ण घरात दागिन्यांसह पैशांचा शोध घेतला. मात्र मिळून न आल्याने सेनापती यांना घरात चोरी झाल्याची खात्री झाली.
चोरट्यांनी सेनापती यांच्या घरातून ८ ग्रॅमचे मंगळसूत्र, ६ ग्रॅमचे मंगळसूत्र, १२ ग्रॅम वजनाची चैन, १० ग्रॅम वजनाची चैन, १३ ग्रॅम वजनाचे टोंगल, ६ ग्रॅमचे कुंडळ, एक ग्रॅमचे लॉकेट, दोन भारचे पैंजन या सोन्याच्या दागिन्यांसह १५ हजार रुपयांची रोकड असा एकूण २ लाख ६८ हजार ६०० रुपयांचा ऐवज चोरुन नेला. घर गेल्या चार दिवसांपासून बंद असल्याची संधी साधत फोटोग्राफरच्या घरात चोरट्यांनी डल्ला मारला. याप्रकरणी पोलिसांनी तपासचक्रे फिरवित अविनाश बन्सीलाल पाटील (वय २६, रा. कुसुंबा, ता. जळगाव) या संशयिताला पोलिसांनी दि. ७ जुलै रोजी अटक केली असून त्याची कसून चौकशी केली जात आहे.





















