जळगाव मिरर | २० जुलै २०२४
सासऱ्याने शिवीगाळ केली तर शालकाने ट्रक खाली लोटण्याचा प्रयत्न केला. असा आरोप करणारे स्टेटस ठेवत दिनकर तुळशीराम पाटील (वय ४०, रा. उमाळा ता. जळगाव, ह.मु. कवली, ता. सोयगाव) यांनी विषारी औषध प्राशन करीत आत्महत्या केली. ही घटना दि. १९ जुलै रोजी सकाळी १० वाजता जामनेर तालुक्यातील करमाळ येथे घडली. जोपर्यंत संबंधितांवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका मयताच्या नातेवाईकांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात घेतली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील उमाळा येथील रहिवासी असलेले दिनकर पाटील हे गेल्या १७ वर्षांपासून सोयगाव तालुक्यातील कवली येथे राहत होते. त्यांचा सासरच्या मंडळींसोबत वाद सुरु असल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले. याच वादातून शुक्रवारी सकाळच्या सुमारास दिनकर पाटील यांनी करमाळा येथे सासऱ्याच्या घरासमोर विष प्राशन केले. या घटनेनंतर गावातील सरपंचांनी वाहन आणले मात्र रुग्णवाहिकेची प्रतीक्षा करीत पाटील यांच्या सासऱ्यांनी सरपंचांच्या वाहनातून त्यांना रुग्णालयात नेऊ दिले नसल्याचा आरोप मयताचे भाऊ रामचंद्र पाटील यांनी केला.काही वेळानंतर आलेल्या रुग्णवाहिकेतून दिनकर पाटील यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मयत घोषित केले.