
जळगाव मिरर | ८ जुलै २०२४
जळगाव तालुक्यातील सुनसगाव रस्त्यावरील शोरूम येथे जात असताना स्पीडब्रेकरवरून दुचाकी उधळून डिव्हायडरला धडक लागल्याने वाहनावरील तरुण ठार झाला आहे. तर त्याचा मित्र आकाश पाटील हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. महेश रामभाऊ माळी (वय २५, रा. झाकीर हुसेन कॉलनी, जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. तो आई, वडील यांच्यासह राहत होता.
मिळालेल्या माहितीनुसार, एका दाल मिल कंपनीत तो काम करीत होता. तर त्याचे आई वडील हे एमआयडीसीतील एका कंपनीत वॉचमन आहेत. महेश व त्याचा मित्र आकाश पाटील हे नशिराबादच्या पुढे महेंद्र शोरूम येथे कामानिमित्ताने ये जा करायचे. शनिवारी रात्री महेंद्र शोरूम येथे गेले होते. त्यावेळेला रात्री ११ वाजेच्या सुमारास गतिरोधकावरून त्यांची दुचाकी नियंत्रणाबाहेर गेली व दुभाजकाला धडकली. या भीषण अपघातात महेश माळी व आकाश पाटील गंभीर जखमी झाले. दरम्यान, महेश याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता तेथे वैद्यकीय अधिकारी यांनी तपासून मयत घोषित केले. यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. पाच बहिणींच्या पाठीवरील एकुलता एक भाऊ असल्याने कुटुंबीयांनी मन हेलावणारा आक्रोश केला. दरम्यान, आकाश पाटील हा जखमी असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. नशिराबाद पोलिस स्टेशनला घटनेची नोंद करण्यात आली आहे.





















