जळगाव मिरर | ४ ऑक्टोबर २०२४
राज्यात सध्या सर्वत्र नवरात्रीचा जल्लोष सुरू असून पाचोरा शहरातील भडगाव रोडवरील एका मंडळातर्फे गरबा दांडियाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रात्री ११ वाजेच्या सुमारास एका २७ वर्षीय तरुणास हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा शहरात विविध मंडळांच्या वतीने गरबा दांडिया स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत. यामध्ये ३ ऑक्टोबर रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास सिंधी कॉलनी परिसरातील रहिवासी असलेले लखन रमेशलाल वाधवाणी नामक युवकाचा एका कार्यक्रमात गरबा खेळत असतांना अचानक चक्कर आल्याने सदर युवक जमिनीवर खाली पडला. तात्काळ काही सहकाऱ्यांच्या मदतीने पाचोरा येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
मात्र तो पर्यंत खुप उशिर झाला होता. सिंधी कॉलनी येथील अतिशय गरीब कुटुंबातील रमेशलाल वाधवाणी यांचा हा मुलगा होता. तो चाळीसगाव येथे पेट्रोल पंपावर खाजगी नोकरी करत असल्याची माहिती देखील मिळाली आहे. त्याचे वडील बूट चप्पलच्या दुकानात कामगार म्हणून काम करून आपला उदरनिर्वाह करत होते. त्यांच्या परिवारातील एकुलता एक मुलगा असलेला अतिशय गरिबीच्या परिस्थितीमधून पुढे आलेला हा युवक मागील वर्षी एका मंडळामध्ये दांडिया किंग देखील ठरला होता. परंतु नशिबाने त्याच्यासोबत जणू थट्टा केली असावी असे चित्र याठिकाणी निर्माण झाले होते.