जळगाव मिरर | ६ ऑक्टोबर २०२४
जामनेर तालुक्यातील पहूर येथून जवळ असलेल्या लोंढरी बुद्रुक येथील तरुण अल्पभूधारक शेतकऱ्याने आपल्या शेतातच झाडाला गळफास लावून जीवनयात्रा संपवल्याची हृदयद्रावक घटना घडली असून कर्जाचा वाढणारा डोंगर आणि पशूपालन व्यवसायात झालेले आर्थिक नुकसान यामुळे आर्थिक विवंचनेत हि घटना घडली असल्याचे समजते.
मिळालेय माहितीनुसार, लोंढरी बुद्रुक येथील जीवन ज्ञानेश्वर भागवत (वय ३८) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. गेल्या काही वर्षांपासून जीवन भागवत हे आर्थिक विवंचनेत होते. आर्थिक संकटावर मात व्हावी, यासाठी त्यांनी म्हैस विकत घेऊन दुग्ध व्यवसाय सुरू करण्याचा प्रयत्न केला. मात्र, यातही यश न आल्याने त्यांनी अखेर शेतातच लिंबाच्या झाडाला गळफास लावून जीवनयात्रा संपवली, असे सांगण्यात आले.
दरम्यान, पहूर ग्रामीण रुग्णालयात त्यांना दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी तपासणी करुन त्यांना मयत घोषित केले. पहूर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप पाटील यांच्या माहितीवरून पहूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यांच्या मृत्यूने पाचवीतील अनिकेत आणि सहावीतील तेजस्विनी या चिमुकल्यांचे पितृछत्र हरपले. त्यांच्या पश्चात वृद्ध आई, पत्नी, लहान भाऊ, वहिनी असा परिवार आहे. घरातील कर्त्या पुरुषाच्या अकाली जाण्याने लोंढरी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.