जळगाव मिरर | ४ जानेवारी २०२५
राज्यात अजित पवार गटाचे नेते व मंत्री धनंजय मुंडे गेल्या काही दिवसापासून संकटात असतांना आता पुन्हा एकदा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एक धक्कादायक दावा केल्याने आणखी एकदा मंत्री मुंडे अडचणीत येण्याची दाट शक्यता आहे.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया म्हणाले कि, राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे 2015 मध्ये एका प्रकरणात आपल्या भगिनी पंकजा मुंडे यांची एक फाईल घेऊन माझ्याकडे आले होते, त्यांच्या या विधानामुळे संतोष देशमुख हत्याकांडामुळे अगोदरच तापलेले बीडचे वातावरण अधिकच तापण्याची शक्यता आहे.
बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांडामुळे अवघे राज्य ढवळून निघाले आहे. या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचे विश्वासू वाल्मीक कराड याचा हात असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे या प्रकरणाची संवेदनशीलता वाढली आहे. वाल्मीक कराड सध्या तुरुंगात आहे. त्यातच विरोधकांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरल्याच्या पार्श्वभूमीवर अंजली दमानिया यांनी उपरोक्त खुलासा केला आहे.
अंजली दमानिया ‘मुंबई तक’शी बोलताना म्हणाल्या, अनेकांना अनेक गोष्टी बाहेर काढायच्या असतात. यासाठी ते अंजली दमानिया यांच्याशी संपर्क साधतात. यात धनंजय मुंडे यांचाही समावेश आहे. धनंजय मुंडे 2015 मध्ये पंकजा मुंडे यांची एक फाईल घेऊन माझ्या घरी आले होते. तेजस ठक्कर नामक व्यक्तीने मेसेज करून ही माहिती दिली होती. ते म्हणाले, तुम्ही बाहेर भेटू शकता का? त्यावर मी म्हणाले, कुणालाही बाहेर भेटत नाही. तुम्ही घरी या. त्यानंतर धनंजय मुंडे व तेजस ठक्कर हे दोघेही माझ्या घरी आले. त्यांनी मला त्या फाईल्स दिल्या. पण अद्याप त्या फाईलवर काम केले नाही. त्यावर कधी तोंडही उघडले नाही. मला जे योग्य वाटते, ज्या प्रकरणात मनापासून लढावे वाटते ते काम मी करते. मी त्यांच्या फाईल्स घेतल्या व ठेवून दिल्या. विशेषतः धनंजय मुंडे माझ्या घरी येऊन गेल्याची बाब पंकजा मुंडे यांनाही माहिती नाही.