जळगाव मिरर | १६ जुलै २०२४
शहरातील महिला महाविद्यालयातील उपप्राचार्यांच्या मुलीच्या लग्नसोहळा असल्याने तीच्या आईने दागिन्यांची हॅण्डबॅग एका कोपऱ्यात ठेवली होती. काही क्षणातच चोरट्यांनी साडेचार लाख रुपये किंमतीचे दागिने असलेली बॅग चोरुन नेली. ही घटना रविवार दि. १४ जुलै रोजी रविवारी एमआयडीसीतील सुरभी लॉन मधील लग्नसमारंभात घडली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील महिला महाविद्यालयात सतीश गुलाबराव जाधव (वय ५२, रा. कोल्हे नगर) हे उपप्राचार्य आहेत. त्यांची मुलगी अचला हिचा लग्नसोहळा रविवारी औद्योगिक वसाहत परिसरातील सुरभी लॉन येथे आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यादरम्यान नववधूच्या आईने त्यांचे ४ लाख ४८ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, दोन हजार रुपयांची रोकड व एक मोबाईल असा ऐवज एका हॅण्ड बॅगमध्ये ठेवला होता. दुपारी अडीच ते तीन वाजेच्या सुमारास लग्न सोहळा सुरू असताना वधूच्या आईला काही काम असल्याने त्या हातातील हॅण्डबॅग हॉलच्या एका कोपऱ्यात ठेवून बाहेर गेल्या होत्या.
नववधूची आई काम आटोपून त्या बॅग ठेवलेल्या ठिकाणी परतल्या. मात्र त्यांना हॉलमध्ये एका कोपऱ्यात ठेवलेली दागिन्यांची बॅग दिसून आली नाही. त्यांनी लग्न समारंभात संपूर्ण शोधाशोध केली मात्र दागिन्यांबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही, या प्रकरणी सतीश जाधव यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध बीएनएस कलम ३०३ (२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनि दीपक जगदाळे करीत आहेत. सकाळपासून लग्न सोहळ्यादरम्यान दागिन्यांची बॅग वधूच्या आईच्या हातातच होती. मात्र काही कामानिमित्त त्यांना बाहेर जायचे असल्याने त्यांनी काही क्षणासाठी ती बॅग एका कोपऱ्यात ठेवली होती नजर ठेवून असलेल्या चोरट्यांनी हीच संधी साधली आणि ती बॅग चोरुन नेली. त्यामुळे चोरटे बॅगवर अगोदरपासूनच लक्ष ठेवून असावे, असा अंदाज पोलिसांकडून वर्तविला जात आहे.
हॉलमधून दागिने चोरीची घटना सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली आहे. यामध्ये दुचाकीवर तीन जण आले, त्यातील दोघे हॉलच्या वरील मजल्यावर गेले व दागिन्यांची बॅग घेवून खाली उतरले. त्यानंतर मागून दोन जण दुचाकी घेऊन आले व हातात बॅग असलेला चोरटा त्यावर बसून तिघेही निघून गेल्याचे फुटेजमध्ये दिसत आहे. दागिन्यांची बॅग चोरणारा चोरटा कमी वयाचा दिसत असून तो लगबगीने बॅग घेऊन खाली आल्याचे देखील फुटेजमध्ये कैद झाले आहे.