जळगाव मिरर | ३ जून २०२५
सावदा-बऱ्हाणपूर-अंकलेश्वर महामार्गावर मोठा वाघोदा गावाजवळील वळणावर सोमवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास एक भीषण अपघात झाला. केळीने भरलेल्या आयशर ट्रक आणि दुचाकीची समोरासमोर धडक होऊन दुचाकीवरील दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. मृत तरुणांची नावे नितीन धनराज कोळी व नितीन रामलाल कोळी (वय ४०, रा. रणगाव, ता. रावेर) अशी असून, ते रावेर येथे विवाह सोहळा आटपून दुचाकीवरून घरी परतत होते. त्यावेळी हा अपघात झाला.
अपघातानंतर ट्रकचालक वाहनासह पसार झाला होता. मात्र, सावधगिरीने पोलिसांनी महाराष्ट्र-मध्यप्रदेश सीमेवरील तपासणी नाक्यावर ट्रक थांबवून चालकाला ताब्यात घेतले. पुढील तपास सावदा पोलीस ठाण्यामार्फत सुरू आहे. मृतदेहाचे शवविच्छेदन रावेर येथील ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले. या अपघातामुळे रणगाव परिसरात शोककळा पसरली आहे.




















