जळगाव मिरर | १८ जुलै २०२४
टिटवाळा येथील येथून साई आश्रय सेवा मंडळ (मांडा कोळीवाडा) शिर्डी येथे जाण्यासाठी पालखी सोहळ्यातील साई भक्तांना बुधवार दि.१७ रोजी चारचाकी वाहनाने सिन्नर नजीक धडक दिल्याने झालेल्या अपघातात टिटवाळ्यातील तीन साई भक्तांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यामुळे मांडा टिटवाळा परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि.१३) रोजी टिटवाळ्यातून शिर्डीकडे पायी जाण्यासाठी साई आश्रय सेवा मंडाळाच्या पालखीने प्रस्थान केले. मंगळवारी (दि.१६) रोजी रात्री आठच्या सुमारास सिन्नर येथील एसएमबीटी रुग्णालया नजीकच्या रस्त्यावरून पालखी जात असता पायी चालणार्या साईभक्तांना चारचाकी गाडीने धडक दिल्याने या अपघातात साई भक्त भावेश राम पाटील, रवींद्र सुरेश पाटील यांचा जागीच मृत्यू झाला तर साईराज भोईरसह सलमान हे साई भक्त गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारार्थ रुग्णालयात नेले परंतु बुधवारी (दि.१७) रोजी साईराज भोईर याला देखील मृत्यूने कवटाळले आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून गाडी चालकाचा तपास करीत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. रवींद्र व भावेश हे चुलत भाऊ आहेत. रवींद्र यांचे लग्न झाले असून त्याला पत्नी व दोन लहान मुली आहेत. रिक्षा चालवून रवींद्र आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता.